About Me

My photo
Nature Lover, Traveller, Astronomer, STEM Educator, Teacher Educator, Science Communicator, Writer and Lifelong Learner

Thursday, 27 June 2024

कृष्णा


संध्याकाळची वेळ… हलका, गार वारा वाहत आहे… वाहत्या नदीचं पाणी वाऱ्याच्या झुळुकांवर थिरकत आहे... काठावरच्या झाडांची पानं सळसळत आहेत… मध्येच कुठून तरी हंबरणाऱ्या गुरांचा आवाज कानी पडत आहे… 

नदीकाठ म्हणजे त्यांची भेटायची आवडती जागा. 

त्यात त्याने फक्त एकच प्रश्न विचारायचा, 

“आज कुठे भेटायचं?” 

नदी ती निवडणार… तिच्या मर्जीने. 

त्याने ऐकायचं; तिथे वेळेत पोहचायचं. 

प्रत्येक निवडीमागे तिचं तिचं असं समर्पक कारण असायचं.

आज कृष्णाकाठ… जवळच कोपेश्वराचं प्राचीन मंदिर - उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना; पाहणाऱ्यानं हरखून जावं असं. महाराष्ट्र आणि कर्नाटक जोडणारा एक जुना लहानसा पूल. दोन्ही बाजूंनी रस्ता तसा कच्चाच. छान जंगल दोन्ही काठांवरती. माणसांची वर्दळ कमीच. पुलावर बसून पाण्यात निवांत पाय सोडता यावे, पुलाखालून संथ वाहती कृष्णा अनुभवता यावी यासाठी उत्तम जागा. 

कृष्णा - हिमालयात पाहिलेल्या उगम पावत्या आकाशकामिनी सारखी अल्लड, अवखळ नाही; की, ऋषिकेशातल्या जणू सागराचं लघु प्रतिरूप वाटावी अशा गंगेसारखी इथे शांत खोल, तर लागलीच पुढे उग्रही नाही. बिहारातल्या आधी मायरूपी तर नंतर काळरूपी कोशीसारखी नाही; की, पुण्याकडल्या दैवदुर्विलासाने गटाररूपी झालेल्या मुळा - मुठेसारखी अवरुद्धदेखील नाही. इथल्या कृष्णेचं सौंदर्य निराळंच.

दिवसभर काय केलं, काय नाही ही तिची बडबड कौतुकाने ऐकून झाली. पर्यायही नव्हता म्हणा न ऐकण्याचा. तिचाच रोजचा दिवस वेगळा असायचा. त्याचे सारे दिवस सारखेच. तरी, फक्त तिच्या हट्टापायी आपल्या दिवसाचं थोडक्यात विवरण केलं त्याने. 

आता दीर्घ शांतता. एकमेकांचे हात हातात घेऊन शांत बसले दोघे… वाहत्या कृष्णेकडे पाहत. त्याला आता हे समजून चुकलं होतं की, इतकी शांतता म्हणजे दोनच अर्थ: 

१. सगळं सुरळीत वाहत आहे, या कृष्णेसारखं; साऱ्याला जोडूनदेखील साऱ्यापासून अलिप्त.

२. वाहता वाहता खोल कुठेतरी काही तरी निसटून जात आहे, या कृष्णेसारखं; वर वर अलिप्त वाहताना सुध्दा कशात तरी काही तरी गुंतून राहिल्याने दुखणारं.

न राहवून ती बोललीच,

“साऊ, एक प्रश्न छळतो आहे रे कधीचा. विचारू?”

“विचार नं.”

“अंती सगळं नसण्यातच जाणार, तर असण्याचा इतका खटाटोप कशापायी रे?”

तिचा साऊ गालातल्या गालात गोड हसला. काही क्षण दोघांत शांतता पसरली. आणि त्याने हळूच बासरी काढली. 

आपले प्राण जसे तो बासरीत फुंकू लागला तसा सारा आसमंत मुग्ध झाला. कृष्णेच्या अंगावर गोड शहारे उमटले. वनराई आनंदे डोलू लागली.

आणि ती? 

ती हसली फक्त… तितकीच गोड. सगळं सगळं कळत होतं तिला. उत्तर आपल्यालाही देता येणार नाही असा तिचा प्रश्न असेल तेव्हा तो हळूच लाडके वेणूचे अस्त्र बाहेर काढायचा. 

“मायेत गुंतवून टाकणं एवढंच जमतं नं तुला?

वेडा आहेस. 

सगळं कळतं बरं मला. 

असो.”  

मनात संवाद करत सावळ्याच्या खांद्यावर अलगद विसावत नेहमीप्रमाणे हरवायचं ठरवूनच अलिप्त राहूनही जणू त्या मायेत हरवून गेली ती.

आज कृष्णेनं सूज्ञ होणं लिखितच होतं.

✍🏼⚡©सोनल थोरवे 

No comments:

Post a Comment