About Me

My photo
Nature Lover, Traveller, Astronomer, STEM Educator, Teacher Educator, Science Communicator, Writer and Lifelong Learner

Tuesday, 2 January 2018

नव्या वर्षाचं रिझोल्यूशन

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
नवीन नवीन सगळं कसं छान वाटतं
अगदी या १ जानेवारी सारखं...
दर वर्षी या तारखेला भिंतीवरचं कॅलेंडर बदलतं;
तसंच बदलतं नव्या वर्षाचं रिझोल्यूशन.

गेल्या कित्येक वर्षांत जे जे म्हणून करायचं बाकी राहिलं,
ते ते मग या संकल्पाच्या यादीमध्ये समाविष्ट होतं.
कोणाला तब्येत वाढवायची, तर कोणाला चरबी कमी करायची;
कोणाला कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवायचा, तर कोणाला स्वतःसाठी वेळ द्यायचा.
कोणाला काही तरी नवं शिकायचं, तर कोणाला आपल्या बालपणीच्या छंदासाठी वेळ काढायचा;
कोणाला व्यसनं सोडवायची, तर कोणाला काही छानशी व्यसनं जडवायची.

हे आणि असेच किती कोण जाणे,
वर्षाच्या या सुरुवातीला संकल्पांचे खच पडतात.
हळू हळू सुरुवात होते, अगदी जोश आणि जल्लोषात!
फिलिंग सारं नवं नवं, जबरदस्त...

एक आठवडा जातो, दोन जातात,
पाहता पाहता बावन्न ही सरतात;
आणि पुन्हा येते नव्या वर्षाची पहिली तारीख.
आजही काही नवे डोंगर रचायचे असतात, संकल्पांचे.
काही 'या वर्षी मात्र नक्की' म्हणत सरल्या वर्षांचेच उकरून काढायचे,
काही 'गेल्या वर्षीचं जरा अशक्यच होतं, आता आपल्याला आपल्या लिमिट्स समजल्या' म्हणत थोडे कमी उंचीचे नव्याने बांधायचे.

या वर्षीही असेच किती कोण जाणे,
संकल्पांचे डोंगर पसरतात.
हळू हळू शहानिशा होते,
मागे का अपूर्ण राहिलं, आणि या वेळी त्या कारणांवर कशी मात करायची याची!
फिलिंग सारं नव्याने जबरदस्त...

काहींचे दर वर्षीप्रमाणे आरंभशूर होतात,
काही सर्व मोहमायेतून आपला मार्ग बरोबर काढतात.
आरम्भशूरांचे आता पुढच्या १ जानेवारीचे हवेत इमले रचले जातात;
आणि याच काळात योग्यांनी आपले एकेक डोंगर सर केलेले असतात.

योगी हळू हळू सराईतपणे पट्टीचे होतात,
आणि
पट्टीचे आरंभशूर योग्यांच्या अचीव्हमेंट्स ना लाइक्स देत 'साला, आपण पुढच्या वर्षी हे नक्की करणार' म्हणत पुन्हा स्वप्नांत हरवतात.

अशा वेळी आमच्यासारखे काही जण कोपऱ्यात आरामखुर्चीवर बसून असतात;
जगाचा समतोल कसा राखला जातो याचं आश्चर्यमिश्रीत कौतुकानं निरीक्षण करत...!


😎
सोनल