About Me

My photo
Nature Lover, Traveller, Astronomer, STEM Educator, Teacher Educator, Science Communicator, Writer and Lifelong Learner

Wednesday, 9 March 2022

'तो'

तिच्याबद्दल अनेक जण अगदी जीव झोकून लिहितात. त्याच्याबद्दल लिहिणारे मात्र क्वचित सापडतात.

बरोबरच आहे... धरणीजवळ बसून मायेच्या चार शब्दांचं पाणी शिंपून तिच्या अंतरातील सगळी हिरवी स्वप्नं जाणून घेता येतात. ती असतेच गोड, मोकळी... हृदयाला जे भिडेल त्यासाठी असेल ते देण्याचं औदार्य ठेवणारी.

पण, आकाशाचा हात धरून त्याच्या हृदयाशी पोहचून, त्याच्या अंतर राखून तोल सावरल्या अंतरात नक्की काय दडलंय हे जाणून घेणंच मुळी सामान्य कल्पनेबाहेर. बरेचदा तर त्याच्याबद्दल असाच समज की 'तो' फक्त एक निर्वात पोकळीच असावा.

'तो' थोडा रुक्ष, अंतर्मुख... हृदय दिसूही ही नये इतकं कधी तेजाळल्या सूर्यप्रकाशात तर कधी अंधाराच्या पडद्यामागे झाकून ठेवणारा. पावसाच्या रूपात कितीही बरसला तरी बरंच काही आत राखून ठेवणारा. त्याचीही स्वप्नं असतातच की... फक्त लपवलेली... कदाचित, कोणी ओरबाडू नयेत किंवा त्याच्यातल्या भावसागराचं समाजाने हसू उडवू नये म्हणून आपल्यापुरतीच ठेवलेली! शेवटी, 'तो' ही माणूसच... रुक्षतेचं कवच पांघरून कोवळ्या स्वप्नांना न व्यक्त करताच जपणारा... तिच्या भावविश्वाला आपल्या खंबीरपणाची आश्वासक झालर घालून सावरणारा - माणूस! त्या रुक्ष, खंबीर कवचामागे 'तो' ही तिच्याइतकाच गोड, मोकळ्या स्वभावाचा असू शकतो. 

तो 'बाप' असतो तेव्हा ही कोवळी स्वप्नं त्याने कितीही थकून घरी आला तरी लेकराला कडेवर घेऊन येरझाऱ्या घालत झोपवताना हलकेच त्याच्या डोळ्यांत चमकताना दिसतात. तो 'भाऊ' असतो तेव्हा ही स्वप्नं बहिणीचा मित्र, भाऊ, बाप अशा रूपात कधी कौतुक, कधी धाक, कधी माया अशा अनेकरूपी आधार स्वरूपात काळाच्या गरजेनुसार अवतरत असतात. तो 'मित्र' असतो तेव्हा ही स्वप्नं तिच्या पंखांना बळ द्यायला सतत सोबत असतात. तो 'नवरा' असतो तेव्हा ही स्वप्नं स्वतःला विसरून तिच्या स्वप्नपूर्तीला हातभार लावायला सरसावताना दिसतात. तो 'मुलगा' असतो तेव्हा ही स्वप्नं आईच्या अनुभवाच्या चटक्यांनी कोरड्या पडू पाहणाऱ्या स्वप्नांवर मायेची पाखर घालून ती तगवण्याचा प्रयत्न करतात. तो 'आजोबा' असतो तेव्हा केस पिकले तरी ती कोवळी हिरवी स्वप्नं नातवंडांच्या कौतुकात खळाळत्या निर्मळ झऱ्यासारखी उधळताना दिसतात.

'तो' आकाश असतो... अंतर राखून अंतर झाकून ठेवणारा! आकाशाचा हात धरून त्याच्या हृदयाशी पोहचून, त्याच्या अंतर राखून तोल सावरल्या अंतरात नक्की काय दडलंय हे जाणून घेणंच मुळी सामान्य कल्पनेबाहेर. पण, 'तो' फक्त एक निर्वात पोकळीच हा समज त्याचा स्वतःचा स्वतःबद्दलसुद्धा असला तरी तो फसवाच असं मला वाटतं.

✍ सोनल