गंमतच आहे! काट्यांनी भरलेलं ते रोपटं घरी आणताना खरचटलेले हात बोंबलत असतात, "नसती मेली हौस" म्हणत. डोळ्यांना मात्र आस असते उद्या येऊ घातल्या कळ्यांची.
डोळ्यांच्या फुलू पाहणाऱ्या स्वप्नापुढे हात आपल्या हलक्या जखमा बाजूला सारतात, आणि रोज पाणी घालू लागतात, त्याच त्या काटेरी रोपट्याला.
कारण?
विश्वास... "डोळे विनाकारण नाही नसत्या फंदात पडणार" यावर.
एक दिवस कळी येते, हळूहळू उमलून गुलाब होते.
डोळ्यांचा आनंद कमी पडावा इतकी कृतार्थता हातांना वाटते.
तोडायचा नसतो गुलाब. त्याचं त्याचं जेवढं उमलायचं उमलू द्यायचा असतो.
पाकळ्या वाळून गळू लागल्या की तो स्वतःच डोळ्यांना "उतरव मला आता, थोड्या पाकळ्या आहेत तोवर तुझ्या हातांत विसावून त्यांची मायेची ऊब अनुभवू दे" म्हणेपर्यंत हात लावायचा नसतो; फक्त स्वप्नील डोळ्यांनी मनात साठवायचा असतो.
एक गुलाब उतरतो, दुसरी कळी उमलू पाहत असते. रोपटं मोठं बहारदार होतं. आसपासच्या इतरही डोळ्यांना स्वप्नं दाखवतं.
डोळे आणि हातांचं स्वप्न पाहण्याचं आणि त्यांना खत-पाणी घालण्याचं काम अविरत, न थकता चालूच राहतं... डोळ्यांचे गुलाब मिटेपर्यंत.

©सोनल थोरवे 
