(आजकाल लोकांची कामाबद्दल व्यसनाधीनता अनेक कारणांनी वाढलेली दिसते. प्रत्येकाची कारणं वेगळी. पण, एक नक्की, कोणीही व्यक्ती by choice workaholic नसते असं मला personally वाटतं. Personal life राहिलं नाही, hobbies जोपासता येत नाहीत etc. तक्रारी असल्या तरी ते लांब ठेवायलासुद्धा बरेचदा हे workaholic जबाबदार असतात. अशाच एका workaholic चा एका सुज्ञाशी झालेला संवाद.)
ती: "पद्य सुचेना झालं आहे रे आजकाल; सगळं सगळं गद्य. का?"
तो: "पद्य सुचायला आयुष्यात ताल हवा, लय हवी, चाल हवी. आहे?"
ती: "उंहु!!! हरवलं आहे रे सगळं. खूप शोधते आहे, कधीपासून. मिळेना यांतले कोणी."
तो: "विचारलंस का स्वतःला, कसे, कधी, कुठे टाकलेस असे की अगदी सापडेना झाले?"
ती: "हो. अगदी न थकता चौकशी चालू आहे. बाहेर तर पिंजून काढलं आहे जग. खोल खोल आतला शोधही चालू आहे."
तो: "हरवले तेव्हा काय मनस्थिती होती आठवते आहे?"
ती: "शेवटचे पाहिले तेव्हा मनाचा मोर झाला होता बघ. थुईथुई नाचत होता, पावसात भिजत होता. नंतरही खूप पाऊस झाला खरा; पण, ना मोर पुन्हा नाचला, ना कागदावर लय-ताला-सुरात शब्द बनून उतरला."
तो: "कुठे अडकून राहिली होतीस इतकी?"
ती: "कामच असणार मेलं; दुसरं काय?"
तो: "हं!!! कामाचं व्यसन... कारण?"
ती: "मन गुंतून राहतं. रितेपण झाकलं जातं. शरीर, मेंदू दोन्ही थकतात, आणि एरवी विश्वभर पसरून उरणाऱ्या मनाला या थकव्याच्या कुंची-टोपडीत गुंडाळून गुपचूप निद्रेच्या कुशीत ढकललं जातं."
तो: "हं... बरं. व्यसन कामाचं असो की इतर, वाईटच.
एक काम करशील? तू भीतीने दूर ढकललेल्या त्या रितेपणाला जवळ घेऊन पाहशील?
मला वाटतं, त्यालादेखील तुझ्या या कोरड्या अस्वीकृतीने भीती वाटली असणार. आणि म्हणूनच त्याने तुझ्या जिव्हाळ्याच्या गोष्टींना hijack केलं असणार. नाही म्हटलं तरी प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे रितेपण. आयुष्याच्या त्या "missing" वाल्या कोपऱ्यावर हक्कच आहे गं त्याचा. त्यालाही स्वीकृतीचा ओलावा हवा असणारंच की.
तुझा acceptance ransom म्हणून मागतोय, देऊन टाक. Captive ठेवलेले तुझे जीवलग सोडतो की नाही बघ."
ती: "भीतीचं काय करू?"
तो: "तो काय वाघोबा आहे तुला खायला?
अगं वेडे, भीती वाटली, झरा आटला; उडी घेतली, समुद्र झाला. झेपलं का काही?"
ती: "हं... काय म्हटलास? झरा नं?
ससा जणू हा भेदरलेला,
'पानच हे तर, हे नभ नाही',
समजून घेता श्वास मोकळा
खळखळला, मग अडला नाही.
खोल दरीच्या पोटातून हा,
झरझर झरझर येता खाली,
तडतड तडतड दगडांवरती
टाळ्या देता हसला गाली."
तो: "हाहाहा!!! झाला तर गडी खुश! आता consultation fees देणार ना?"
(आता आपल्याच logic ला consultation fee म्हणून काय बरं देऊ?)
✍🏼⚡© सोनल थोरवे



