About Me

My photo
Nature Lover, Traveller, Astronomer, STEM Educator, Teacher Educator, Science Communicator, Writer and Lifelong Learner

Wednesday, 3 July 2019

वारी

(2012 मध्ये आईबरोबर, आणि नंतरच्या वर्षी राणीबरोबर एका स्वयंसेवी संस्थेसोबत जास्त नाही पण काही किलोमीटर वारीमध्ये चालायचा योग जुळून आला. ही देहू-आळंदीहून निघालेली हजारों मंडळी शिस्तबद्ध पद्धतीने पंढरपूरवासी विठ्ठल-रखुमाई चे नाव घेत छान टाळ-मृदुंगाच्या तालावर हसत-नाचत त्यांच्या ओढीने चालत होती. यांच्या या उत्साहाचे कारण काय असावे असा प्रश्न पूर्वी सारखा मनात यायचा खरा; पण या वेळी उत्तरात सामील होण्याचेच जणू भाग्य लाभले.)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विठाईच्या गजरात हरपले देहभान।
ना ही पायी रे वहाण, नाही भूक ना तहान।।
माथी तुळस पावन करी पापांचे क्षालन।
माय रखुमाईरूप प्रेम आनंदाचा घन।।

टाळ-मृदुन्ग तालांत, नाम हरीचे मुखांत।
वर फाटले आभाळ तरी नाचतो सुखांत।।
चोखा, सावता नि तुका, ज्ञाना झाले एकरूप।
साऱ्या डोळ्यांत सावळा हरी दिसे मायबाप।।

रग नाही पायां परि ओढ विठू-दर्शनाची।
बळ देते चालावया दिव्य साथ अभंगांची।।
तिथे चंद्रभागेतीरी दोन्ही कर कटावरी।
वाट पाही लेकरांची उभा विटेवरी हरी।।


😇 सोनल

Sunday, 30 June 2019

विश्वरूप जन्मगाथा

(मॉन्सून चा पाऊस आणि आषाढीची वारी यांनी हा जो काही माहौल तयार होतो नं त्यामुळे वारीमध्ये प्रत्यक्ष सामील नसणारे देखील मनाने वारकरी होऊन विठूच्या गजरात चिंब भिजत राहतात. आता बघा, वारीला प्रत्यक्ष जायला सुट्टी काढणं अजून तरी शक्य झालेलं नाही... पण म्हणून मनाने हा असा असहकार पुकारावा म्हणजे काम ही बोंबललंच की! अशा शांत घालमेलीच्या वेळी साऱ्या संसारी संतांची शिकवण मदतीला धावून येते... आश्चर्य म्हणजे न सुचणारं केव्हाचं या पावसात अडकून राहिलेलं काम विनासायास होऊन जातं! 
आणि एक प्रेमळ प्रश्न समोर येतो... कामात, संसारात विठू पाहणाऱ्या या संतांच्या अभंगांत असलेली शिकवण मदतीला धावून आली की त्यांच्या रूपात स्वतः त्यांचा लाडका विठुरायाच धावून आला असावा बरं?)
 ~~~~~~~~  

सावळा सावळा विठू दिसे भोवताली
ध्यानी-मनी ओठी-कानी त्याचें नामाची सावली ।।

लिहू जाता जरा काही उमटतां कुठे शाई
उमटते नाम त्याचे, दृष्टी तयालाच पाही ।।

लेखणीले काय सांगू? बये, काम खूप आहे;
ग्रह-गोलांचा संसार तुले मांडायाचा आहे ।।

विठू सार तू कडेला, अवकाश घे जवळी
मांड जीवनी तयाची तव शब्दांच्या जंजाळी ।।

ऐकेल ती नवल, शब्द सुचेनाच काही
इतक्यात अवकाश सारे दाटुनिया येई ।।

ग्रह-गोल-तारका नि घन वायूंचे जमता
फेर धरूनिया सारे विठूरंगी ते रंगता,
विश्वरूप एक क्षण अंतरंगी आकळतां
शाई लिहाया लागली विश्वरूप जन्मगाथा ।।

© सोनल  
😇
💞

Sunday, 3 March 2019

तूच

तूच;

हो अरे, तुझ्याशीच बोलते आहे...
कोणी आहे का इकडे माझ्याशी बोलणारं दुसरं?

तूच आहेस...
सगळीकडे...
अगदी सगळीकडे!

माझ्या शांत-निवांत चालू आयुष्याच्या प्रवासात अचानक विचित्र, खडतर वळणे घेणारा;
सगळं गोड-गुलाबी असताना अचानक दुधात लिम्बू पिळणारा...
हो अरे, तूच तो.

तूच तो,
सारं करून सावरून खूपच लोभस हसून मला पुन्हा मोहात पाडणारा!

इतर कोणाची एवढी मजल माझ्या आयुष्याला धक्का लावण्याची?
नाकासमोर चालणाऱ्या, ताठ ताठ करून बरेचदा स्वतःचा कणा अवघडून घेणाऱ्या अहंप्रेमी माझ्या अस्तित्वाला ठेचून काढण्याची?
फक्त तुझीच!

फक्त तू,
माझ्या अहंकारी फण्यावर चढून त्यावर मोहक तांडव करणारा;
आत्मघातकी एकेक मस्तक तोडून मला नतमस्तक करणारा;
आणि सर्व विकार सोडायला भाग पाडून या नवचैतन्याला उचलून कवेत घेणारा!
हो, हे केवळ तूच करू शकतोस.

हो अरे, तूच!
आता तूच तर उरला आहेस सारं विश्व व्यापून...
आपल्याच अग्नीत राख होऊन पुनर्जन्म घेणाऱ्या फिनिक्सची निर्मिती तू आणि फक्त तूच करू शकतोस.
तुझ्याच लाडक्या रचनेला साऱ्या चढ-उतारांची जाणीव करून देणारा,
प्रसंगी तिचा राग झेलणारा, प्रसंगी बोलही खाणारा;
आणि तरीही सर्वत्र हात धरून ठेवणारा!

हो अरे, तुझ्याशीच बोलते आहे...
कोणी आहे का आसपास तुझ्याविना दुसरं?

आता तूच आहेस...
सभोवती...
आणि अंतरात!

 :) सोनल