About Me

My photo
Nature Lover, Traveller, Astronomer, STEM Educator, Teacher Educator, Science Communicator, Writer and Lifelong Learner

Wednesday, 12 August 2026

उधाण

आजचा दिवस फार म्हणजे फारच विचित्र...

कातरवेळी सगळा दिवस डोळ्यांसमोरून सरकतोय.

बाहेर ढग कोसळताहेत आणि इथे डोळे झरायचे थांबेनात.


भावनांचा महापूर जणू...

प्रकाशाच्या वेगाला गाठू पाहणारा.

शब्दांत उमटण्यासाठी अधीर;

भाषा समजेल असे कान असावेत अशा भाबड्या आशेने कुठे तरी हेलावणारा.

आणि...

कुणीच नाही.

कातरवेळेचा नसता मेला खेळ.


असं वाटतंय,

जणू अख्खा हिमालय, सह्याद्रीला घेऊन 

एकाच वेळी हृदयावर कोसळत आहे.


तिन्ही बाजूंनी वेढा घालणारे हे महासागर

आज अशक्य उधाण घेऊन जणू 

मला स्वतःमध्ये सामावून घेण्याचा

निर्धार करून आले आहेत.


धरायला जावं तर एकही हात दिसत नाही;

हाक मारावी, तर ऐकेल असंही कुणी नाही.


आणि डोळ्यांतले ढग

बरसणं थांबवेना झालेत.


जन्माने प्रकाश पण...

प्रकाशाचं मर्म भेदलं जाऊ शकतं?

सगळं अस्तित्व कसं सुटसुटीत, सावरलेलं...

असं कसं होऊ शकतं? 

निर्व्याज मनस्वी प्रकाशाला

हे असं कोंडीत धरलं जाऊ शकतं?


ते ही, क्षणभर रेंगाळणाऱ्या कातरवेळेच्या मुठीत?

✍🏽⚡© सोनल थोरवे 

Tuesday, 4 August 2026

खिडक्यांच्या पलीकडे...

एक वेळ अशी येते,
जेव्हा एकटेपणालाही कोणीतरी यावं, हात धरावा, 
अशी अपेक्षा राहत नाही.
तो फक्त शांतपणे तिच्या शेजारी येऊन बसतो.

ती उघडत जाते एकेक खिडकी, 
संवादांची...

एकेक नाव...
उत्तरांच्या शोधात??? 
नाही, नाही...
अशा एका जागेच्या शोधात, 
जिथे तिचं मन पोहोचल्याबद्दल तिला वाईट वाटत नाही.

आणि जेव्हा अशी एकही जागा सापडत नाही,
तेव्हा ती एकेक खिडकी अलगद बंद करत जाते...


एक दीर्घ उसासा,
...आणि मग पुन्हा
ती स्वप्नांच्या वाटेवर निघून जाते.

कारण तीच एक जागा असते,
जिथे तिचं फक्त असणं
पुरेसं असतं.

✍🏽⚡© सोनल थोरवे