About Me

My photo
Nature Lover, Traveller, Astronomer, STEM Educator, Teacher Educator, Science Communicator, Writer and Lifelong Learner

Monday, 19 September 2016

वेल-सॉर्टेड आयुष्य

आपलं आयुष्य कसं वेल-सॉर्टेड असतं. प्रत्येक कामाचे, प्रत्येक छंदाचे, प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक नात्याचे वेगवेगळे कप्पे नकळत बनलेले असतात आपल्या मनात. हो, हे वेल-एक्सपांडेबल सुद्धा असतं. नवीन येत राहिलं तर जागा बनत जाते, जुनंच वृद्धिंगत होऊ लागलं ती विस्तारत जाते. काही कमी झालं तर पोकळी निर्माण होते हेही तितकंच खरं!

बरेचदा ही पोकळी रेफिलेबल, रिप्लेसेबल असते; कधी कधी मात्र तिच्यात तितक्याच एकरूपतेने सामवणारं असं दुसरं काही मिळत नाही. मग एकाकीपणाची झलक त्या जाळीतून दिसत राहते.

अर्थात एककीपणाच्या अस्तरावर जसा जीव जन्म घेतो, तसा आईच्या नात्यापासून पुढे इतर कप्पे रचत जातो. म्हणजेच, कमी झालं काही की सजवलेल्या पोकळीतून बॅकग्राउंड दिसतं आणि अस्वस्थता येते. आपल्या विश्वाची सजावट करण्यासाठी आपण नेमून दिलेले कलाकार असे अचानक नाहीसे झाले की हे होणारंच.

या कप्प्यांची एक मजा अशी, की आपण त्या त्या कप्प्यातल्या आपल्या रोपांना वेळोवेळी हवे तसे प्रेमाचे आणि काळजीचे खत-पाणी दिले की ती आपल्या आनंदासाठीच डवरतात. कधी रोगीट फांद्या काढून योग्य वाढीस वेळ द्यावा लागतो; कधी तळाची माती सुयोग्य करावी लागते. ठराविक कालावधीने धूळ झटकावी लागते.

प्रत्येक कप्पा आपापलं असं व्यक्तिमत्व घेऊन जगत असतो. सगळ्या रंगांच्या धाग्यांनी निर्गुण अस्तराला शोभाच येते. आणि खुलून दिसतो आपला जीवनपट! हर क्षण नाविन्यपूर्ण, हर क्षण रोमांचक, हर क्षण उत्सुक आणि हर क्षण सुंदर... फक्त या सजवलेल्या कप्प्यांमुळे!

काही नाती मात्र अशी असतात की त्यांना एखादा कप्पा पुरतंच नाही. एका लहानशा कप्प्यापासून सुरू होऊन ती अफाट विस्तृत व्हायला लागतात. अशा वेळी आपसूक त्याचं क्षितिज रुंदावत जातं, आणि अस्तरावर एक मोठा रंगीन असा पट त्या नात्याचा बनतो. आता आपल्या एकाकी बॅकग्राउंडपुढे  फोरग्राउंड म्हणून हा पट स्वतःच्या अस्तित्व-छटा आपल्या आयुष्यावर उमटवत राहतो.
                
या विस्तृत क्षितिजाचे दोन मानकरी असतात. 
पहिले, आरंभापासूनचे आपले सोबती - आदरणीय जन्मदाते. 
दूसरे, मागाहून येऊनदेखील स्वतःच्या रंगांत अलवार आपल्याला तन्मय करणारे आपले प्राणप्रिय जीवलग! 
हे जीवलग छंद, मित्र, कला यांतले कोणीही असू शकते. या विस्तारलेल्या पटावर छंद कलात्मक, कला मैत्री तर मित्र छंदोमय झालेले असतात.
                
ही क्षितीजे, कप्प्यांचं विश्व कधी कोसळलंच तरी खंबीर सख्य निभावत असतात. आपले अस्तित्वाचे अस्तर न उसवता त्याला मायेने सुशोभित करत असतात; नवी ओळख देत असतात. 

आपलं आयुष्य हे जसं वेल-सॉर्टेड असतं, तसंच ते आपल्याही नकळत वेल-मैनेज्ड देखील असतं.
या नकळत सुरळीत घडवल्या जाणाऱ्या कुशल व्यवस्थापनासाठी निर्मिकाचे आभार मानावे तितके कमीच! 
हे सुंदर आयुष्य लाभले, भरून पावले. याहून सुंदर काय असावे?


:)
सोनल