"अगं आजी, जीन्स - टॉप वर कोणी गजरा घालतं का?"
"अन् मग काल रात्री तासभर घालवून मोठ्या हौसेने गुंफलास तो?"
"कंफर्ट क्लोद्स् म्हणतात गं याला. बरं वाटतं, सुटसुटीत. राहू दे तो गजरा."
"पोरींची कापडं संपली की काय? बरी दिसतात ती. नेहमी नेहमी कसला मेला तो कंफर्ट पाहिजे असतो गं?"
काय माहित, काय झालं. ऐकलं पोरीने आजीचं. छानसा पंजाबी ड्रेस, केसांची वेणी, एरवी भुंड्या असणाऱ्या कपाळावर चंद्रकोर आणि वेणीवर माळलेला गजरा.
आई "हिला आजीच हवी" असं मनातल्या मनात म्हणत हसू दाबून कौतुक पाहत राहिली.
...
गजरा,
तासभर वेळ देऊन गुंफला होता रात्री... दिवसभराचा थकवा आणि डोळ्यांवर झोप होती खरी. पण, मामीने भरभरून आणलेली अंगणातली जुईची फुलं... काय तो त्यांचा सुगंध... अहाहा! थकवा वगैरे कुठल्या कुठे विसरून गेली होती ती. आई म्हटली, "छान गजरा बनव आणि घाल उद्या कामाला जाताना". तिनेही विचार न करता घेतली फुले हातात. सुई - धागा ओवून जुईची भरगच्च माळ बनवताना कौतुकाने स्वतःच पाहत होती. आणि आज मात्र सवयीप्रमाणे आवरून जीन्स - टॉप चढवले निघताना. गजऱ्याचा विसर पडला होता अर्थातच!
आजीने आठवण केली म्हणून...
असे कितीतरी सुगंधी गजरे वेळात वेळ देऊन आपण स्वतःसाठी गुंफवून ठेवत असू. आणि, ऐन वेळी गडबडीच्या किंवा सोय पाहण्याच्या नादात विसरून जात असू. स्वतःसाठीच बनवले ना? त्यांचा विसर का पडावा? संस्कार आणि सौंदर्यावर सोय कधी वरचढ झाली? संस्कार निसर्गदत्त सुंदर निर्मितीचे कौतुक करण्याचे... सौंदर्य त्या कौतुकाला प्रेमाने मिरवण्याचे. सोयीच्या, सुटसुटीतपणाच्या नादात कितीतरी अशा आल्हाददायक गोष्टींना मुकत असू नं आपण???
...
असो.
गजरा तिने एकटीने माळला होता खरा; पण दिवसभर ऑफिसच्या आवारात ती जिथे जाईल तिथे सुगंध दरवळत होता. तिचं जाऊ दे, आसपासचं एकूणच वातावरण सुगंधी अन् त्यामुळे कामाच्या भाराखाली मनाने थकलेली मंडळीही प्रसन्न होत होती.
"बरं झालं, आजीने आठवण केली, सोमडीत शालजोडाही मारला खरा.
प्रत्येक गजऱ्याची आठवण करायला आजी कायम असेल??
स्वतःसाठीच तर बनवला होता मी,
गजरा!"
✍🏼⚡© सोनल थोरवे

No comments:
Post a Comment