About Me

My photo
Nature Lover, Traveller, Astronomer, STEM Educator, Teacher Educator, Science Communicator, Writer and Lifelong Learner

Friday, 12 June 2020

आजोबा

आजोबा...
एक व्यक्तिमत्त्व, जे खास नातवंडांचं 'आपलं' असतं. वडीलधारे, वडील ही धाकात राहावेत असे आजोबा. यांचा धाक सुदधा असावा तो प्रेमळ, आदरयुक्त. यांच्या पहिल्या हाकेला साद न देण्याची हिम्मत कोणाची नसावी. त्याच वेळी यांच्या पाठीवर कोकरू बसून फिरण्याची बिशाद मात्र आपली असावी. यांनी आपल्याला हातचलाखी करून इकडच्या हातातील लेमनेड ची गोळी किंवा पार्ले-जी चं चॉकलेट तिकडच्या हातातून काढून दाखवावं, आणि मग 'ही कसली जादू, हे बघ मी काय केलं' म्हणून ही युक्ती शिकवावी. यांनी आपल्याला एका मांडीवर बसवून दुसरीवर आकाशवाणीवर चालू असलेली कोण्या नाट्यसंगीताची सुरेल मैफिल ऐकत हाताने ठेका धरावा, आणि आपण पण त्यांना टाळ्या वाजवत साथ द्यावी. यांनी आपल्यासोबत लहान मूल होऊन घोडा-घोडा, चोर-शिपाई खेळावं. आपण खोडी केली की यांनी ती पकडावी, आणि गरजेनुसार कान पिळून लब्बाड नातवंडाला गोडीत किंवा हात धरून अवखळ नातवंडाला जरबेत घ्यावं.

आजोबा...
आजीकडून ऐकलेल्या रामायण, महाभारतातल्या, सुर-असुरांच्या गोष्टी, आणि आजोबांकडून कधी दटावताना, तर कधी समजावताना ऐकलेले जीवनातील सुर-असुरांत भेद करायला शिकवणारे अनुभवाचे बोल यांची शिदोरी जन्मभर पुरून उरते.
कधी कधी काही नातवंडांना आजोबांचा हा अनमोल सहवास लाभतच नाही, तर कधी आमच्या सारख्यांना तो अगदीच नाममात्र लाभतो. काहींना मात्र हे रत्न बराच काळ साथ देतं.

आमच्या सारख्या, आजोबांचा सहवास नाममात्र लाभलेल्या किंवा अजिबात न लाभलेल्या नातवंडांसाठी काही व्यक्तिमत्व शब्दरूपात सामोरे उभी ठाकतात. वडिलांची वाचनाची आवड आम्हा पोरांची दिवाळी ठरते आणि असंच बोधकथा वाचता वाचता केव्हा तरी विनोदी कथा सांगणारे एक आजोबा भेटतात. त्यांच्याशी जी गट्टी होते ती कदाचित कधीच शब्दांत वर्णन न करता येण्याइतकी घट्ट असते. हे आजोबा हसवतात असं बऱ्याच जणांनी सांगितलेलं असतं. यांच्या गाजलेल्या एकपात्री प्रयोगांतील छोटे भाग वर्गातील हरहुन्नरी मुलं मोठ्या उत्साहाने रंगवतात. यांच्या पुस्तकांना वाचनालयातून आणून अगदी प्रेमाने जवळ घेतलं जातं, आणि ती संपतोवर बाकी जग विसरलं जातं (खरं तर सापडत जातं, उमगत जातं). जसं कळतं वय होतं तसं जाणवतं, 'अरेच्या! हे आजोबा तर म्हणजे गुरूमाणूस.' हसवता हसवता कधी टचकन डोळ्यांत पाणी आणतील कळत ही नाही; आणि उगाच आपल्याला आपलंच असं किंवा आपल्या भोवतालचं एखादं, अगदी परिचयाचं वाटणारं माणूस या आजोबांनी गोष्ट सांगता सांगता उलगडून ठेवलेलं असतं. या आजोबांचा थोतांडावर विश्वास नसतो. शुद्ध स्वच्छ विवेकबुद्धी काय ते हे आजोबा हसवता हसवता शिकवतात. आमचे हे लाडके आजोबा गंभीर असतानाही हसवतात ओ! हे फक्त यांनाच जमतं. हे आजोबा आम्हाला माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी देतात... हे आजोबा आम्हाला समाजाचं आपण देणं लागतो ही जाणीव आपल्या कार्यातून अजिबात गाजावाजा न करता करून देतात... हे आजोबा आम्हाला जगण्याचा आनंदोत्सव कसा करावा हे स्वतःच्या जगण्यावरून दाखवून देतात... 

हे आजोबा ज्या दिवशी हे भौतिक जग सोडून गेल्याचं कळतं तेव्हा आम्ही पोरके झाल्याचं दुःख होणार आणि आम्ही रडणार एवढ्यात आजोबांचा आवाज कानांत घुमतो, 'बाळा, या माणसाने आजवर जसे हसवले तसे इथून पुढेही हसवत राहणार!' हसता हसता डोळ्यांत पाणी आणणारे आजोबा आता रडता रडता हसवून ही जातात. पण त्यांचे शब्द खरे असतात. ते जगातून गेले तरी ते आजही आमच्यासोबत असतात, कधी विनोदांतून, कधी नाटकांतून, कधी संगीतातून, कधी भाषणांतून, कधी गाण्यांतून, कधी कवितांतून, कधी किस्स्यातून... किती रूपं सांगू? एक अगदी खरं, आजोबा नुसतं जगायला नाही, तर हसत जगायला शिकवतात. सबंध राज्याचं लाडकं व्यक्तिमत्त्व असले तरी आमचे असे 'आपले' असणारे हे आजोबा... सातत्याने सोबत असतात. 

प्रत्यक्ष भेट कधी झाली नसली तरीही ती उणीव कधीच भासू न देणारे हे आजोबा निःसंशय जगाहून निराळे असले तरी आपल्यातले एक, आपलेच असतात!

✍ सोनल 
x

Thursday, 7 May 2020

Buddha's Smile





Buddha... 
Somebody had placed his broken statue at some random place on a random tree in the university campus. His statue was almost ruined & yet I could recognise those familiar expressions on his face. He was listening to the world around with his ears open,  looking at the world with his eyes ajar, & still his smile was somehow reflecting the calmness of his mind. 

What was that? Why was he smiling? 

We, a group of people gathered around him to share quality time with each other were sharing so much pain, sorrows & unpleasant experiences about our own worlds. I'm sure there weren't even 30% of the things shared pleasant. I'm sure there was much of an opaqueness in the conversation instead of a transparency. There must be other people too whom he must have been witnessing daily. There must be other lives too with 'kabhi khushi kabhi ghum' scenarios happening on a regular basis. There must be some studious people studying hard to get their dreams to fulfill. There must be some lovebirds hanging out to share sweet moments. There must be some couples fighting over silly misunderstandings breaking each other's hearts. There must be some friends bunking classes & creating memories. There must be some lonesome person visiting that place daily regretting about why couldn't they appreciate their companion when they were with them. There must be some sensitive mind planning for a revenge to force its way to what it wants. There must be many smiles, many tears, many evils, many dreams, many nightmares floating all day around him. Yet... He Was Smiling!!!


I asked him while being lonely into the group, 'There is so much going on with everyone... almost indigestible. How can you still smile?' He answered me back with one of his gestures that I was totally ignoring all this time. He was bearing 'Abhayamudra' - the gesture representing protection, peace, kindness & the dispelling of fear. Suddenly, it was crystal-clear. What my tiny brain could understand was the 'acceptance of it as it is', 'living it with tranquility' & 'reacting to it with understanding' is what turns into the peace, the fearlessness, the kindness, the bliss Buddha's smile was reflecting.

His smile was strange, yet enchanting. 
Surprisingly, I happened to smile back at him.


☺ Sonal

Monday, 30 March 2020

माझी मंडळी

माझा बहावा जागोजागी फुलायला सुरुवात झाली असेल... काटेसावरीच्या म्हाताऱ्याही मुक्त वाऱ्यावर उडायला सुरुवात होईल आता. मार्च संपलाच की, एप्रिल आला तशी ही माझी मंडळी आठवायला लागली आहेत.

हो, दर वर्षी या वेळी रस्त्यांवरून येता-जाता पिवळ्या फुलांचे दागिने एकेक करून चढवत जाणारा बहावा जागोजागी दिसतो. मग मी जागोजागी थांबते. प्रत्येक बहावा हा त्याचं वय आणि त्याची जागा यांनुसार (बहुधा) वेगवेगळ्या प्रमाणात फुललेला असतो. मग मी त्याच्या वेगवेगळ्या रुपांना कधी कॅमेरात तर कधी मनात चित्रबद्ध करायचा प्रयत्न करते.



काटेसावरीच्या म्हाताऱ्या मात्र आमच्या कार्यस्थळापाशी अगदी गळाभेट घ्यायला उत्सुक असतात. वाऱ्यावर त्यांनी धरलेल्या तालावर मी सुद्धा भिरभिरत राहते, बराच वेळ... कधी चहाचा ब्रेक, कधी जेवणाचा ब्रेक, कधी स्नॅक्सचा ब्रेक तर कधी कामाचे तास संपल्यानंतरचा मोठा ब्रेक यांची वाट पाहत असते ते फक्त या म्हाताऱ्यांना जवळून भेटण्यासाठी; त्यांना न दुखावता अलगद ओंजळीत भरण्यासाठी आणि कौतुकानं घरी आणून त्या मऊशार कापसाचे लाड करण्यासाठी. कामाच्या वेळी तसा एरवी वेळ शोधून सापडत नाही, पण सापडलाच तेव्हा गेल्या वर्षी या सावरीच्या कापसाची एक छोटीशी गोडुली उशी बनवण्यात यश आलं होतं. आता कामांनंतरही वेळ मिळतो आहे खरा, पण तो सगळा कापूस जमा वेगळ्याच ठिकाणी आहे आणि मी वेगळ्या ठिकाणी.

काल आवश्यक सामान घ्यायला बाहेर पडले तसा फारच तीव्रतेने आठवला मला माझा बहावा... माझी काटेसावर... आणि दुर्दैवाने ज्या मर्यादित रस्त्यांवरून मी फिरले त्यांवर यांतले कोणीच भेटले नाही. मार्च संपलाच की, एप्रिल आला तशी ही माझी मंडळी बोलवायला लागली आहेत. या वर्षी बहाव्याला त्याच्याभोवती गरगर फिरून, प्रत्येक जमेबल अँगल ट्राय करून फोटोसाठी त्रास द्यायला मी नाही म्हणून खुश असेल बिचारा. कदाचित आनंदाने आणखी पिवळाधमक होऊन हसत असेल. कार्यस्थळाचे सगळे कोपरे जिथे एरवी कदाचित फक्त आमचे साफसफाई करणारे सहकारी जातात, आणि एप्रिल मध्ये मी घुटमळत असते त्यांमध्ये आता म्हाताऱ्या छान लोळत, घरंगळत, फिरत बसतील बिचाऱ्या. त्यांना गोळा करायला, त्यांच्यामागे वेड्यासारखी धावायला, आणि कधी सफाई करणाऱ्या सहकाऱ्यांना 'त्यांना केरात नका फेकू ओ असे; मला कळवा, मी येते ना घ्यायला' अशी विनंती करायला मी नाही. या म्हाताऱ्यांना एकटी सापडली की पकडून टेबलवर ठेवून 'इलिप्टिकल गॅलक्सी सारखी दिसतेस गं तू' म्हणून तिचा तो गॅलक्टिक फॉर्म सांभाळत फोटो काढायला मी नाही म्हणून इतस्ततः भरकटत असतील, उत्साहात.

छे! मीच बिचारी... ते उमलताहेत, फुलताहेत, बहरताहेत, उडताहेत आणि मला त्यांचं नाममात्र दर्शन सुद्धा होईना. असो... स्टे होम, स्टे सेफ आहे नं... त्यांनाही जरा स्वतंत्र उंडारू दे त्यांच्या त्यांच्या राज्यात, कोणा मनुष्याच्या हस्तक्षेपाविना...!

त्यांना आठवण येत असेल का माझी???

✍️ सोनल

Friday, 20 March 2020

स्वप्न

Picture Credits: Ishan Shinde

मनाच्या घरात घर करून राहिलेलं एक स्वप्न...
निर्मळ हास्याइतकं हवंहवंसं,
रात्रीच्या चांदण्याइतकं देखणं.

जगावं कधी तरी आपणही मुक्त पाखरासारखं,
जोडावे बंध आकाशाशी,
गूज करावे फुला-फळांशी,
गिरक्या घ्याव्यात स्वतःशी,
गुणगुणावं स्वतःशी स्वतःचंच गोड गाणं...

ढग होऊन आकाशात
इतस्ततः भरकटावं,
होऊन पाऊस कधी 
तृषार्तांवर बरसावं;
अनुभवावं कधी ढगांमध्ये वीज होऊन बागडणं...

व्हावं कधी उगवतीची पूर्व दिशा मोहक,
कधी स्वतः सूर्यच व्हावं,
जरी जीवनदाता,
तरी थोडासा दाहक;
मावळतीला व्हावं पश्चिमेचं समाधानपूर्ण हसणं...

होऊन वृक्ष कधी अर्पावं जीवन इतरांसाठी,
कोणाचा तरी आधार व्हावं.
कधी तप्त रक्त होऊन 
नसानसांत भिनावं.
जगावं बनून एक आशेचा किरण,
जावं आपण जेथे, तेथे अवतरावं स्वर्गानं...

मनात घर करून राहिलेलं हे माझं छोटसंच स्वप्न,
नक्कीच केव्हा तरी होईल पूर्ण, 
हे त्याचं सख्खं शेजारी स्वप्न...!

☺ सोनल 

Thursday, 19 March 2020

कवितांचं गाव


कवितांच्या गावात एक उनाड धाव,
चंद्रावर कोरलेले आपलेच नाव.
हरलेला डाव नसतोच आपला,
अनवाणी पायांत असतात चपला.

सातही रंग इंद्रधनूचे,
नाजूक गंध रातराणीचे,
झुळूक मनाला मोहविणारी,
सारे काही आपलेच असते;
रडणारे मन ही इथे खळखळून हसते...

कवितांच्या गावात कधी भासतो
अनोळखी देश ही अगदी जवळचा,
नवीन ऋणानुबंध घडवितो
स्नेह आपला अन् कवितांचा.

गुलाबाचा बोचणारा काटा,
रानामधल्या पाऊलवाटा,
समुद्राच्या व्यथित लाटा,
अन् हरवलेल्या धुक्यात वाटा,
आपणच असतो नि आपणच जगतो;
आपणच हरवतो नि आपणच रमतो...

कधी रम्य, कधी दाहक भासणारे
कवितांच्या गावातील सारेच भाव;
पळत-ठेचकाळत, हसत-खेळत
प्रत्येकानं भटकावं एकदा तरी हे गाव.

🌹
सोनल

Sunday, 15 March 2020

COVID 19 - नवमग्रह


"अगं पोरी, हा असा दुर्गेचा अवतार घेऊन कामाच्या ठिकाणी जाऊ नकोस. वाईट होऊ नकोस कोणासाठी", इति काळजीग्रस्त मातोश्री. "अगं, तुला पण कळतोय नं सिरीयसनेस? संताप स्वाभाविक आहे", सात्विक संतापग्रस्त मी. "कळतंय गं, पण शांत हो", आई म्हटली. आणि माझ्यातल्या त्या दुर्गेला कसं तरी शांत केलं खरं. पण, शंका देवींनी ही संधी साधली. 

"आय.एस.आय. चा एजंट तर नाही नं हा?"
"मानवी बॉम्ब, अगदी 100 टक्के."
"हो, नाहीतर काय? कोण सुज्ञ सुशिक्षित म्हणवला जाणारा तरुण असं काही करेल?"
"हा स्वतःच्या तंदुरुस्तीच्या गुर्मीत इतरांचा जीव मात्र धोक्यात घालणार."
"मानवी जैविक बॉम्ब... अगदी... पक्का..."

हसताय? हसा लेको! 
हे असे माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला मानवी जैविक बॉम्ब्स वाटणारे काका, काकू, चाचा, ऑन्टी, मित्र, मैत्रिणी प्रत्येकाच्या सामोरे येत असणार याबद्दल मला खात्री आहे. 

अगदी विज्ञान किंवा प्रयुक्त विज्ञानाच्या पदवीधर असलेल्यांपैकी जेव्हा हे मानवी बॉम्ब्स सापडतात तेव्हा एक विज्ञानाचा विद्यार्थी आणि प्रसारक म्हणून जीव आणखी दुखावतो. वैज्ञानिक दृष्टी, किंवा खरं तर कॉमन सेन्स, सामान्य ज्ञान ज्याला म्हणावं, जे खरं तर पारंपारिकरीत्या अशिक्षित म्हणू शकू अशा मनुष्यमात्रांकडेही असतं... मग, हे आपले काही विज्ञानक्षेत्रातील बांधव-भगिनी डोक्यावर पडले आहेत काय? 

म्हणजे, वेळ काय आहे? काळ इकडे सर्वांच्या डोक्यावर नागोबासारखा फणा काढून बसला आहे, हे समजून न घेता "कोणता विषाणू माझं काही वाकडं करू शकत नाही", "अरे काय तो करोना बिरोना, मला काय करणार?", "मी अगदी ठणठणीत आहे" असं जर कोणी देशबांधव अरेरावीने म्हणत असेल; जो देशात सर्वप्रथम COVID 19 ग्रस्त एक नव्हे अनेक केसेस सापडल्या अशा ठिकाणी महिन्यापेक्षा जास्त काळ, परदेशी पाहुण्यांच्या (अगदी करोनाची मायभूमी वूहान येथील मंडळीसुद्धा) संपर्कात राहून येणार असेल आणि वरिष्ठांनी सभ्य शब्दांत प्रवासातून इकडे आल्यावर काही दिवस घरून काम करण्याचा दिलेला सल्ला धाब्यावर ठेवून "लोकांना काम टाळायला कारणच हवं असतं", "मी त्यातला नाही", "मी कार्यालयात हजेरी लावणारच" हा हटवादीपणा करत असेल, तर माझ्यातली दुर्गा का नाही जागी होणार?

सर्व जनतेला इथे माहित आहे, तो करोना काका गेले काही महिने जगभरातील आपले बस्तान बसवत चालला आहे. सबंध जगात तब्बल 135 देशांमध्ये हा करोना काका नवम-ग्रह (हो, आता सूर्यमालेत 8 च ग्रह असतात) म्हणून घुसून बसला आहे. आजच्या तारखेला जगभरात 153517 COVID 19 ग्रस्त कन्फर्म्ड, भारतात आत्ता सकाळी 8 वाजता 93 असलेला आकडा 10 वाजता 110 कन्फर्म्ड वर आला आहे. यात जगभरात 5735 तर भारतात 2 दगावले आहेत. भारतात करोना काकांना पसरविणारे मुख्य कारण हे "imported cases" किंवा "बाहेरील देशांतून आलेले प्रसारण" नसून "local transmission" किंवा "स्थानिक प्रसार" आहे.

या अशा परिस्थितीमध्ये अगदी सगळे राजकारण बाजूला ठेवून सरकार आपापल्या ठिकाणी योग्य असे नियम लागू करत आहे, चाचण्या आणि उपचारांची सोय करत आहे; यासोबत जनतेला आवाहन करत आहे की "लेक हो, काळजी घ्या". गरजेचं आहे. योग्य ते सामाजिक भान न बाळगून करोना काकांसाठी दरवाजा का स्वतः होऊन उघडायचा? ठीक आहे, आपण ऐन तारुण्यात आहात, आपली प्रतिकारशक्ती जगात भारी वगैरे आहे... अहो, पण आपले कार्य ज्या जागी आहे तिथे आबालवृध्द कधीही आगंतुक म्हणून येतात ओ. रोज किमान 2 चिल्ली-पिल्ली किंवा 2 वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक हे विना परवानगी सामोरे ठाकलेले असतात "आम्हाला तुमचं सेंटर पहायचंय" म्हणून. जरा त्यांचा विचार करा. 

इथे कोणी कोणाला वाळीत टाकत आहे अशीही स्थिती नाही. आम्हां सगळ्याचं कामावर तेवढंच प्रेम आहे जेवढं तुमचं आहे. आम्ही ही तरुण रक्त आहोत. पण, स्वतःसोबत इतरांची ही काळजी आम्हाला आहे कदाचित. म्हणजे, मला सर्दी-खोकला झाला, किंवा मला काहीही न होता फक्त मी प्रवासातून दुसऱ्या अफेक्टेड रिजन मधून आलो आहे म्हणून मला तुम्ही घरी बसवताय याचं दुःख मानण्यापेक्षा, "मी कोणत्या जीवघेण्या विषाणूचा इतरांसाठी "carrier" किंवा "वाहक" तर होत नाहीये ना?" या सदसदविवेकबुद्धीने केलेल्या विचाराला धरून मी घरून जेवढं जास्त जमेल तेवढं काम करेन. तरुण रक्त, जगात भारी प्रतिकारशक्ती वगैरे असेल ही, पण "सर सलामत तो पगडी पचास" हे सामान्य ज्ञान शाळेत शिकवलेलं जतन केलंय आम्ही.

त्या कोण Google वाल्या काकांच्या काकू, COVID 19 पॉझिटीव्ह सापडल्या तर पळून दुसऱ्या राज्यात गेल्या. आणखी काही पॉझिटीव्ह केसेस उपचार करून न घेता उपचारकेंद्रांतून पळून गेले. कसं व्हायचं आपल्या देशाचं? अरे, उपचार करून बरे होणाऱ्यांची संख्या कैकपटीने जास्त आहे. का आपल्या एका भीतीने अनेक जीव धोक्यात घालायचे? इथे अजून लोक भर रस्त्यांवर थुंकतात; रुमाल वगैरे न वापरता बिनधास्त समोरच्याच्या तोंडांवर खोकतात, शिंकतात. काय चाललंय काय? म्हणजे, मान्य आहे, आपली लोकसंख्या खूप आहे, म्हणून अशी कोण्या परदेशी विषाणूच्या हातात स्वतःसकट अविचारीपणाने देऊन टाकायची? "बडे बडे देशो में छोटी छोटी बाते होती रहती है सेन्योरिता" असे शाहरूख बनून या विषाणूंना आपणहून प्रसाराला मदत करायची का?

एवढा स्वस्त झालाय मार्केट मध्ये माणसाचा जीव? हो, दहशतवादी कारवायांनाही हेच प्रश्न मी विचारू शकते, पण त्या आपल्याला सांगून होत नाहीत. इथे आपण सजग झालो आहोत, काय हरकत आहे थोडं शहाणपण दाखवायला? थोडी काळजी घायला? काय हरकत आहे, जरा कष्ट घेऊन वेळेची गरज ओळखून वागायला?

(आकडेवारी व माहिती स्त्रोत: covidindia.org , www.who.int)

- सोनल