(Image Courtesy: Avinash Kulsange, Anandwan, Chandrapur)
एक व्यक्तिमत्त्व, जे खास नातवंडांचं 'आपलं' असतं. वडीलधारे, वडील ही धाकात राहावेत असे आजोबा. यांचा धाक सुदधा असावा तो प्रेमळ, आदरयुक्त. यांच्या पहिल्या हाकेला साद न देण्याची हिम्मत कोणाची नसावी. त्याच वेळी यांच्या पाठीवर कोकरू बसून फिरण्याची बिशाद मात्र आपली असावी. यांनी आपल्याला हातचलाखी करून इकडच्या हातातील लेमनेड ची गोळी किंवा पार्ले-जी चं चॉकलेट तिकडच्या हातातून काढून दाखवावं, आणि मग "ही कसली जादू, हे बघ मी काय केलं" म्हणून ही युक्ती शिकवावी. यांनी आपल्याला एका मांडीवर बसवून दुसरीवर आकाशवाणीवर चालू असलेली कोण्या नाट्यसंगीताची सुरेल मैफिल ऐकत हाताने ठेका धरावा, आणि आपण पण त्यांना टाळ्या वाजवत साथ द्यावी. यांनी आपल्यासोबत लहान मूल होऊन घोडा-घोडा, चोर-शिपाई खेळावं. आपण खोडी केली की यांनी ती पकडावी, आणि गरजेनुसार कान पिळून लब्बाड नातवंडाला गोडीत किंवा हात धरून अवखळ नातवंडाला जरबेत घ्यावं.
आजोबा...
आजीकडून ऐकलेल्या रामायण, महाभारतातल्या, सुर-असुरांच्या गोष्टी, आणि आजोबांकडून कधी दटावताना, तर कधी समजावताना ऐकलेले जीवनातील सुर-असुरांत भेद करायला शिकवणारे अनुभवाचे बोल यांची शिदोरी जन्मभर पुरून उरते.
कधी कधी काही नातवंडांना आजोबांचा हा अनमोल सहवास लाभतच नाही, तर कधी आमच्या सारख्यांना तो अगदीच नाममात्र लाभतो. काहींना मात्र हे रत्न बराच काळ साथ देतं.
आमच्या सारख्या, आजोबांचा सहवास नाममात्र लाभलेल्या किंवा अजिबात न लाभलेल्या नातवंडांसाठी काही व्यक्तिमत्व शब्दरूपात सामोरे उभी ठाकतात. वडिलांची वाचनाची आवड आम्हा पोरांची दिवाळी ठरते आणि असंच बोधकथा वाचता वाचता केव्हा तरी विनोदी कथा सांगणारे एक आजोबा भेटतात. त्यांच्याशी जी गट्टी होते ती कदाचित कधीच शब्दांत वर्णन न करता येण्याइतकी घट्ट असते. हे आजोबा हसवतात असं बऱ्याच जणांनी सांगितलेलं असतं. यांच्या गाजलेल्या एकपात्री प्रयोगांतील छोटे भाग वर्गातील हरहुन्नरी मुलं मोठ्या उत्साहाने रंगवतात. यांच्या पुस्तकांना वाचनालयातून आणून अगदी प्रेमाने जवळ घेतलं जातं, आणि ती संपतोवर बाकी जग विसरलं जातं (खरं तर सापडत जातं, उमगत जातं).
जसं कळतं वय होतं तसं जाणवतं, "अरेच्या! हे आजोबा तर म्हणजे गुरूमाणूस." हसवता हसवता कधी टचकन डोळ्यांत पाणी आणतील कळत ही नाही; आणि उगाच आपल्याला आपलंच असं किंवा आपल्या भोवतालचं एखादं, अगदी परिचयाचं वाटणारं माणूस या आजोबांनी गोष्ट सांगता सांगता उलगडून ठेवलेलं असतं. या आजोबांचा थोतांडावर विश्वास नसतो. शुद्ध स्वच्छ विवेकबुद्धी काय ते हे आजोबा हसवता हसवता शिकवतात. आमचे हे लाडके आजोबा गंभीर असतानाही हसवतात ओ! हे फक्त यांनाच जमतं. हे आजोबा आम्हाला माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी देतात... हे आजोबा आम्हाला समाजाचं आपण देणं लागतो ही जाणीव आपल्या कार्यातून, अजिबात गाजावाजा न करता करून देतात... हे आजोबा आम्हाला जगण्याचा आनंदोत्सव कसा करावा हे स्वतःच्या जगण्यावरून दाखवून देतात...
हे आजोबा ज्या दिवशी हे भौतिक जग सोडून गेल्याचं कळतं तेव्हा आम्ही पोरके झाल्याचं दुःख होणार आणि आम्ही रडणार एवढ्यात आजोबांचा कानांत आवाज घुमतो, "बाळा, या माणसाने आजवर जसे हसवले तसे इथून पुढेही हसवत राहणार!"
हसता हसता डोळ्यांत पाणी आणणारे आजोबा आता रडता रडता हसवून ही जातात. पण त्यांचे शब्द खरे असतात. ते जगातून गेले तरी ते आजही आमच्यासोबत असतात, कधी विनोदांतून, कधी नाटकांतून, कधी संगीतातून, कधी भाषणांतून, कधी गाण्यांतून, कधी कवितांतून, कधी किस्स्यातून... किती रूपं सांगू? एक अगदी खरं, आजोबा नुसतं जगायला नाही, तर हसत जगायला शिकवतात.
सबंध राज्याचं "लाडकं व्यक्तिमत्त्व" असले तरी आमचे असे "आपले" असणारे हे आजोबा... सातत्याने सोबत असतात. प्रत्यक्ष भेट कधी झाली नसली तरीही ती उणीव कधीच भासू न देणारे हे आजोबा निःसंशय जगाहून निराळे असले तरी आपल्यातले एक, आपलेच असतात!
✍🏼©सोनल थोरवे
(P.S. : २००० मध्ये शाळेतच होते. आजोबा गेल्याची बातमी सगळ्या वृत्तपत्रांत पहिल्या पानावर दिसत होती. कधीच प्रत्यक्षात न भेटलेले हे आजोबा, पण खूप रडले होते. तेव्हा शब्दांत व्यक्त होणं माहित नव्हतं. आयुका मध्ये कार्यरत असताना २०१९ साली पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्त एक सोहळा आखण्यापासून पूर्णत्वाला नेण्यापर्यंत जबाबदारी पार पाडली होती. पुलंनी जोडलेल्या अनेक संस्था, अनेक माणसांसोबत भेटी झाल्या, ओळख झाली. त्यांतून न ऐकलेल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या, न पाहिलेली क्षणचित्रे पाहायला मिळाली. तोपर्यंत भावनांचं बऱ्यापैकी विश्लेषण करून शब्दांत मांडणंही जमायला लागलं होतं. त्या वेळी लिहिलेला हा लेख.)

No comments:
Post a Comment