About Me

My photo
Nature Lover, Traveller, Astronomer, STEM Educator, Teacher Educator, Science Communicator, Writer and Lifelong Learner

Tuesday, 3 October 2023

Short-cut शोधण्याच्या नादात…

माणूस short-cut शोधण्याच्या नादात big-time रस्ते चुकतो तेव्हा…

Google बाई काय, धोपट मार्ग सांगते, म्हणून तिच्यावरचा अविश्वास आड येतो. उगाच आपला शहाणपणा (1.5🤐) test करायचा म्हणून आधीच्या माहितीच्या जोरावर डोकं लढवून 'ह्याला समांतर हीच गल्ली, तिकडेच जायला हवी', वगैरे अंदाज बांधतो. आणि मग माणूस गल्लीबोळांतून मार्ग शोधत dead end ला पोहोचतो.
नशीब, इतर माणसांशी बोलता येतं म्हणून... मग कोण्या मावशी, काकांना आपल्या destination चा मार्ग विचारतो. त्यांनी सांगितलेल्या गल्लीबोळांतून कुठून कसं कोणास ठाऊक ओळखीच्या कोण्या रस्त्याला लागतो, आणि कसं हुश्श होतं. Short-cut च्या नादात माणसाचे petrol, वेळ आणि energy असं बरंच काही extra खर्च होतं. 

ठीकच आहे म्हणा... कधी आयुष्यात फिरकण्याचा विचार नसेल केला अशा नवीन गल्ल्या पाहिल्याचं उगाच समाधान. त्यात एखादी गल्ली छानशा नदीकाठावर वसलेली असते. आत जाताना उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त दिसल्याने मनात 'रस्ता चुकीचा असावा' अशी पाल चुकचुकलेली असते. पण, आपलं उजवीकडे नदी, डावीकडे छोटीशी घरं, आणि पुढे हिरवीगार शांतता, दगडी मंदिरं आणि मंदिराबाहेर समोरच्या ओसरीखाली निवांत वर्तमानपत्र वाचत बसलेले पांढरा शुभ्र कुर्ता-पायजमा परिधान केलेले आजोबा... असं वाटतं, गाडी आपोआपच आपल्याला घेऊन पुढे जाते आहे.

असो... Dead-ends कितीही भुरळ पाडणारे असले तरी नोकरदार माणसांना परवडणारे कुठे असतात? माणसाला u-turn घेऊन मार्ग शोधण्यावाचून पर्याय नसतो. माणूस आपापल्या कार्यालयात पोहोचतो खरा... पण, तिकडे न पोहोचवणाऱ्या, शांत, निवांत सुद्धा जग असू शकतं हे दाखवणाऱ्या गल्ल्यांची, माणसांची चित्रं मनात साठवून. ठीक आहे, आपले मार्गच रहदारीचे... म्हणून, दूरवर दडलेल्या शांत वाटांच्या वाटेला कधी जाऊच नये असं कुठे कोणी सांगितलं आहे? क्षणभर का असेना, मनाला तेवढीच काय ती विश्रांती. 

मला वाटतं, चुकावेत कधी तरी रस्ते... माणसाला नक्की कशाची ओढ आहे, आणि कशाची गरज आहे याचा एक reminder मिळतो. गरजेच्या गोष्टींबद्दल तकतक करणं आपोआप बंद होतं, आणि ओढीकडे सुद्धा अधूनमधून वेळ काढून डोकवावं याचाही नव्याने साक्षात्कार होतो.

माणूस short-cut शोधण्याच्या नादात big-time रस्ते चुकतो तेव्हा कदाचित त्या short time interval मध्ये तो big-time कुठे तरी अंतरातले योग्य मार्ग धरून दूरवर फिरून आलेला असतो.

✍⚡ सोनल थोरवे 

Saturday, 23 September 2023

आपला तो बाब्या

'आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं' ही इयत्ता ६वीत ७वीच्या त्या वेळच्या scholarship exams मधील मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात असलेल्या व आवडीने, समजून उमजून पाठ केलेल्या १६४ म्हणींपैकी एक.

तसं एरवी सगळीकडे अनुभवायला मिळणारं सत्य. दुसऱ्याच्या पोरांनी काही गाढवपणा केला तर काकवा तोंडं वेडीवाकडी करणार. तोच गाढवपणा आपलं पोर करतं तर त्याचं कौतुक करतात, त्याची बाजू घेतात. तसंच, समोरच्याने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी आपण किंवा आपलं ओळखीतलं कोणीतरी ती याहून चांगली कसं करतात हे सांगायला माणसं अधीर असतात.
म्हणजे, ठीक आहे. मानवी स्वभावच तो.

आपण असं कधी करू असं वाटत नसताना दर वर्षी गौरी - गणपती मध्ये देवदर्शनाला इतरांच्या घरी गेलं की का कुणास ठाऊक, पण आपल्या घरच्या गौरायांचं रूपडं काकणभर वरचढ वाटायचं. बुद्धीला लहानपणापासून एक गोष्ट पटलेलीच होती, की रूप वगैरे असं तुलना करण्याची गोष्ट नव्हे. प्रत्येक व्यक्ती तशी प्रत्येक मूर्ती, आपापलं सुंदर अस्तित्व असते. पण, डोळ्यांना झेपत नसावं का हे? सौंदर्याच्या एकुणात संकल्पना इतक्या tight कुठून होत असाव्यात? 
कित्येक वर्ष झाली, आजही परिस्थिती तीच. पाहूनही डोळे, मन भरून एक प्रकारचं समाधान अवकाश व्यापून उरावं असं रूप आमच्याच गौरायांचं. 
इतरांसारख्याच साच्यांतून घडलेल्या त्या मूर्ती. अनेक तशाच्या तशाच. मग?

मला वाटतं, त्यांना घरच्या लेकीसारखं नटवताना आपल्या आपल्या सौंदर्याच्या व्याख्येतून आपलं आपलं कलाकौशल्य आपण अक्षरशः त्या मूर्ती जीवंत भासाव्या यासाठी त्यांत उतरवत असतो. एकसारख्या साच्यातून घडलेल्या त्या मूर्तींना आपलेपण आपण देत असतो. म्हणून, आपल्या नजरेत त्याच भरतात.

कसं असतं ना आपलं पण... आपला तो बाब्या तसा प्रत्येकाचाच बाब्या आपापला असतो. जशी आपापली life story. कारटं नसतंच कोणी. दुसऱ्याच्या बाब्याला कारटं म्हणण्याअगोदर प्रत्येकाला हा विचार करता आला तर???
✍🏼⚡सोनल

Friday, 28 July 2023

ओढ

'तू, मी आणि रिमझिमता पाऊस'
मेंदीच्या कोवळ्या वयात लिहिलेल्या ओळी;
मेंदी रंगली, रापली, उताराला लागली,
वहीत बंद आहेत, अजूनही. 
वाचणारे डोळे, ऐकणाऱ्या कानांची ओढ
हिरव्या शाईत रंगल्या ओळींना, अजूनही.

कोणी आले, ऐकायला आतुर, 
भाषा उमजली नाही.
कोणी आले, वाचू पाहिले,
भाव समजला नाही.

तू, मी आणि रिमझिमता पाऊस
चिंब भिजून आठवणींत, वहीत बंद, हसणारे.
तू, मी आणि रिमझिमता पाऊस
मेंदीच्या कोवळ्या वयात उमटून,
अनाम ओढीच्या अंताला आसुसणारे.

अनोळखी कोपऱ्यात बंद वहीत 
हिरव्या स्वप्नांचे निशाण, अजूनही. 
वाचणारे डोळे, ऐकणाऱ्या कानांची ओढ
शाई फिटत चालल्या ओळींना, अजूनही.

✍🏼सोनल

Friday, 23 June 2023

Work is Worship

(Disclaimer: वाचू नये असे काही
खूप खूप खूप दिवसांनी जे काही लिहीन ते हे असलं काही असावं असं चुकूनही वाटत नव्हतं खरं. पण, आता लिहिलंय. आणि वाचलंच तर याचा कोणत्याही वास्तविक घटना, व्यक्ती, स्थळे यांच्याशी संबंध नाही असे हे ध्यानात ठेवून करमणूक म्हणून वाचावे. संबंध सापडल्यास लेखक जबाबदार नाही.)

डोळ्यांवर झोप खूप आहे गं आई,
मला की नै आज उठायचंच नाही.

किती तरी दिवस busy busy च गेले,
रात्रींना उद्याच्या ताणाने ग्रासले.
building म्हणे capacity चं,
काय ती fancy fancy नावं;
वर्षानुवर्षं आनंदाने, आवडीने कामं करूनही नालायकच आम्ही,
२४ तास कामंच करायला हवं.
असं कुठे असतं का गं आई?
मला की नै आज उठायचंच नाही.

धावून धावून सुजले आहेत पाय,
आता धड उभंही राहता येईना.
बोलून बोलून बोंबलला घसा, गोड गायचा आधी, 
त्याला आता न खोकता ४ शब्दही बोलता येईना.
जमायचं इच्छा आणि आवडीने कठीण कठीण गोष्टी शिकायला आजवर,
डोक्यावर तलवार, मेंदूला आता नव्याने धड जुनंही बरं वाटेना.
डोळे उघडून बागडण्यातली सगळी चव गेली आई,
मला की नै आज उठायचंच नाही.

पोटासाठी नोकरी म्हणतात,
आणि जेवायला मात्र वेळच नाही.
बुद्धीला खत-पाणी द्यायच्या नावाखाली,
भीती नाकर्तेपणाची, 
जणू आम्ही आयुष्यात कणभरही केलं नाही काही.
आई - बाप, पोरं - बाळं, भावंडं - मित्र, 
सगळ्यांना विसरायचं म्हणे,
Work is worship, ती worship करत त्यातच मरायचं म्हणे.
Weekend नाही, me - time नाही, तुला भेटायला, तुझ्या हातचं जेवायला 
कुठून वेळ पैदा करू सांग ना गं आई?
शनिवार असला काय झालं? बळं बळं लादलेली खूप कामं असतात,
तुला कळायचं नाही.
डोळ्यांवर झोप अजूनही खूप आहे गं आई,
मला देवाशप्पथ आज उठायचं नाही...

मला देवाशप्पथ उठायचंच नाही...

✍🏼सोनल