माझा बहावा जागोजागी फुलायला सुरुवात झाली असेल... काटेसावरीच्या म्हाताऱ्याही मुक्त वाऱ्यावर उडायला सुरुवात होईल आता. मार्च संपलाच की, एप्रिल आला तशी ही माझी मंडळी आठवायला लागली आहेत.
हो, दर वर्षी या वेळी रस्त्यांवरून येता-जाता पिवळ्या फुलांचे दागिने एकेक करून चढवत जाणारा बहावा जागोजागी दिसतो. मग मी जागोजागी थांबते. प्रत्येक बहावा हा त्याचं वय आणि त्याची जागा यांनुसार (बहुधा) वेगवेगळ्या प्रमाणात फुललेला असतो. मग मी त्याच्या वेगवेगळ्या रुपांना कधी कॅमेरात तर कधी मनात चित्रबद्ध करायचा प्रयत्न करते.
काटेसावरीच्या म्हाताऱ्या मात्र आमच्या कार्यस्थळापाशी अगदी गळाभेट घ्यायला उत्सुक असतात. वाऱ्यावर त्यांनी धरलेल्या तालावर मी सुद्धा भिरभिरत राहते, बराच वेळ... कधी चहाचा ब्रेक, कधी जेवणाचा ब्रेक, कधी स्नॅक्सचा ब्रेक तर कधी कामाचे तास संपल्यानंतरचा मोठा ब्रेक यांची वाट पाहत असते ते फक्त या म्हाताऱ्यांना जवळून भेटण्यासाठी; त्यांना न दुखावता अलगद ओंजळीत भरण्यासाठी आणि कौतुकानं घरी आणून त्या मऊशार कापसाचे लाड करण्यासाठी. कामाच्या वेळी तसा एरवी वेळ शोधून सापडत नाही, पण सापडलाच तेव्हा गेल्या वर्षी या सावरीच्या कापसाची एक छोटीशी गोडुली उशी बनवण्यात यश आलं होतं. आता कामांनंतरही वेळ मिळतो आहे खरा, पण तो सगळा कापूस जमा वेगळ्याच ठिकाणी आहे आणि मी वेगळ्या ठिकाणी.
काल आवश्यक सामान घ्यायला बाहेर पडले तसा फारच तीव्रतेने आठवला मला माझा बहावा... माझी काटेसावर... आणि दुर्दैवाने ज्या मर्यादित रस्त्यांवरून मी फिरले त्यांवर यांतले कोणीच भेटले नाही. मार्च संपलाच की, एप्रिल आला तशी ही माझी मंडळी बोलवायला लागली आहेत. या वर्षी बहाव्याला त्याच्याभोवती गरगर फिरून, प्रत्येक जमेबल अँगल ट्राय करून फोटोसाठी त्रास द्यायला मी नाही म्हणून खुश असेल बिचारा. कदाचित आनंदाने आणखी पिवळाधमक होऊन हसत असेल. कार्यस्थळाचे सगळे कोपरे जिथे एरवी कदाचित फक्त आमचे साफसफाई करणारे सहकारी जातात, आणि एप्रिल मध्ये मी घुटमळत असते त्यांमध्ये आता म्हाताऱ्या छान लोळत, घरंगळत, फिरत बसतील बिचाऱ्या. त्यांना गोळा करायला, त्यांच्यामागे वेड्यासारखी धावायला, आणि कधी सफाई करणाऱ्या सहकाऱ्यांना 'त्यांना केरात नका फेकू ओ असे; मला कळवा, मी येते ना घ्यायला' अशी विनंती करायला मी नाही. या म्हाताऱ्यांना एकटी सापडली की पकडून टेबलवर ठेवून 'इलिप्टिकल गॅलक्सी सारखी दिसतेस गं तू' म्हणून तिचा तो गॅलक्टिक फॉर्म सांभाळत फोटो काढायला मी नाही म्हणून इतस्ततः भरकटत असतील, उत्साहात.
छे! मीच बिचारी... ते उमलताहेत, फुलताहेत, बहरताहेत, उडताहेत आणि मला त्यांचं नाममात्र दर्शन सुद्धा होईना. असो... स्टे होम, स्टे सेफ आहे नं... त्यांनाही जरा स्वतंत्र उंडारू दे त्यांच्या त्यांच्या राज्यात, कोणा मनुष्याच्या हस्तक्षेपाविना...!
त्यांना आठवण येत असेल का माझी???
✍️ सोनल
✍️ सोनल




