About Me

My photo
Nature Lover, Traveller, Astronomer, STEM Educator, Teacher Educator, Science Communicator, Writer and Lifelong Learner

Thursday, 7 March 2024

जाडू

"जाडू, उठली तर आहेस भल्या पहाटे. पण, जमणार का? म्हणजे, तशी पहिलीच वेळ आहे. की झोपुयात सरळ? सुट्टी पण आहे; चांगला आराम होईल. आठवडाभरचा थकवा, घरची कामं, बरंच काही आहे. पायात चप्पल चढवण्या आधी परत विचार कर." (पहाटे ०५:०० वाजताचा स्वतःसोबतचा संवाद... पुढची गोष्ट खाली...)

"आळस पाचवीलाच पुजला आहे गं... किती कुरवाळणार त्याला? चल, निघ आता", असं स्वतःला सांगून ०५:३५ ला पायांत चप्पल चढवून स्वारी गाडीचा स्टार्टर मारून ठरल्या ठिकाणी निघाली. 

आज (१६.०२.२०२४ - रथसप्तमी/ माघ शुक्ल सप्तमी) 'जागतिक सूर्यनमस्कार दिन' होता. जयश्री ताई म्हटली होती, "जितके जमतील तितके सूर्यनमस्कार घाला. मग ते अगदी ५० असतील तरी हरकत नाही, पण या. एकूण ३ तास competition आहे. ज्यांना १०८ जमतील त्यांनी तितके घाला. दम लागला तर थांबत करा. ज्यांना पुढे करायचे असतील त्यांनी continue करा. ३ तास आहेत." 

"४०-५० तर आता करूच शकतो की. सवय अजिबात नाही आहे तशी व्यायामाची. कामाच्या व्यापात गेली काही वर्ष स्वतःच्या तब्येतीची सर्रास हेळसांड केली आहे. गेला महिनाभर प्रयत्नांती जरा शिस्त लावण्याचं काम चालू आहे. त्यात जयश्री ताई (योगा गुरू) छान मार्गदर्शन करते. Let's try." सगळी आपापली बडबड करत hall वर पोहोचले. काही जणी आल्या होत्या तर इतर योगा class-mates हळूहळू join होत होत्या.

आपापल्या योगा mats अंथरल्या गेल्या. जे एक set करून निघणार त्यांनी पुढच्या बाजूला कडेला थांबा म्हटल्यामुळे आपली mat तिकडे पसरली गेली. ताईने warm-up घेतला आणि sharp ०६:०० वाजता सूर्यनमस्कार सुरू झाले. २५ - ३० जण होतो कमीत कमी. अतिविचारी स्वभावामुळे वेड्यासारखं मन नको तिथे भरकटत होतं. “जमलंच नाही तर? मागे ती rib ला hairline crack गेली होती, तिचं काही नाही ना उद्भवणार? कामापायी धडपडून २ वर्षांपूर्वी मुका मार लागलेल्या पायाचं काय? अजूनही दुखतो, सुजतो तो अधे मध्ये चुकून आडवा-तिडवा पडला की. आठवतंय ना, डॉक्टर काकांनी WFH दिलं होतं महिनाभर, complete bed rest मिळावी म्हणून? ते कामाची १५-२० किलोची ओझी उचलून काय ribs मध्ये cartilage ना सूज आली होती ७-८ महिन्यांपूर्वी; heart attack यावा तसे shooting pain दर श्वासागणिक व्हायचे. त्यावर परत ताण आला तर?” “अगं ए मुली, आपण करतोय काय, आपलं चित्त कुठे? ती audio record मधली बाई आकडे मोजते आहे ना, तिच्या आवाजावर लक्ष दे”, असं प्रत्युत्तर देत देत विचारांची frequency भटकभवानी मनाला हाणून मारून कमी केली.

संपले १०८ सगळ्यांसोबत.

Group photo झाले. जल्लोष होणारच! इतक्या जणांनी १०८ पूर्ण केले; खाऊ आहे का? उगाच हजार वेड्यांत एक शहाणा विचार आला आणि ताईला विचारलं, “१०८ जमतील की नाही माहित नाही, पण जमतील तेवढे करायला थांबले तर चालेल इतरांसोबत?” आणि ताईने प्रोत्साहनपूर्ण होकार दिला. एकटीच नव्हते मी, आणखीही काही जणी अशा विचाराने थांबल्या. Hall भरलेलाच होता, कारण कमी झालेल्यांची जागा पुढच्या batch साठी आलेल्यांनी भरली गेली. “१०८ तर झाले. आता मला वाटतं एखाद-दुसरा set फार फार तर करू आणि निघू. झोप काढायची आहे. घर आवरायचं आहे. Bookshelf लावायची आहे. कपडे धुवायचे आहेत.” “अगं हो! शांत हो. It's okay. सुट्टी काढली आहेस ना? जरा वर्तमानात रहा. ताईच्या instructions वर concentrate कर. ती बाई, ते आकडे, लक्ष तिकडे ठरलंय ना? श्वासांकडे लक्ष दे. बघ, छान वाटतंय. शरीर कसं छान वळत आहे, दर नमस्कारानंतर प्रत्येक involved आसन थोडं आणखी better होतंय”, बऱ्यापैकी कमी झालेल्या विचारांना पण झापावं लागलं. हळू हळू फक्त ठरवलेल्या गोष्टी ऐकू यायला लागल्या, हवं तिथेच मन गपगुमान अडकलं. 

तिकडे ताई प्रत्येक १२ नंतर किती नमस्कार झाले याचा count देत होती, आणि ‘आपणच streak jinx नको करायला’ म्हणून मी तो आकडा शुद्ध ignore करत होते. सगळ्यांनी वाजवल्या की सोबत टाळ्या वाजवत होते.

झाले पण पुढचे १०८. हायला!!!

“बरं… चला! कुठे? घरी… २१६... काकोबाने केले होते का? तोडून मोडून बसशील.” “गप ना, let's try another round. जमतंय तितकं जमवू हेच तर deal आहे. बघू… Stay!”, म्हणून थांबले. आता मात्र जसे १२ चे एकेक set होत गेले तसे तळहात बोंबा मारायला लागले. मग काय? Direct नेऊन ठेवलं स्वतःला त्या situation मध्ये जिथे मध्यरात्री पाय मुरगळला आहे, कोणाला सांगितलं नाही आणि आपण भल्या पहाटे २-३°C मध्ये तुंगनाथापासून चंद्रशीलेकडे चढत आहोत. सगळे सोबत आहेत, म्हणून… पोहोचत आलो आणि black ice. जीवघेणा... बास्स, थांबू इथे. इथवर आलो, खूप झालं. आणि इतक्यात तन्मय म्हणे, “यहाँ तक आये हो, जिन्दा. इतनासा तो बचा है, चलो sunrise देखना है सबके साथ। यहाँ तक नहीं मरे, तो अब इतने से थोड़ी ही मरोगे? Go ahead!” अजून आठवतंय, शिखरावर पोहोचल्या पोहोचल्या त्याच्या गळ्यात पडून रडले होते किती… निखळ… भाव? फक्त कृतज्ञतेचे! 

आताही त्या बाईचे आकडे आणि तन्मयचा आवाज... एक real time आणि एक मनातल्या जुन्या महत्त्वाच्या कप्प्यातला, इतकंच ऐकू येत होतं. सोबत महत्त्वाचा आवाज जयु ताईचा. सगळ्यांना encourage करत होती. 

९ वाजले होते. 


सकाळी ६ ते ९...

३२४… झाले. 

कोणामुळे? सगळे सोबत होते म्हणून. 

स्पर्धेचं काय? ती स्वतःच्या आळसासोबत होती. आळस हरला पाहिजे. 

Motivation? काल जिथे होतो तिथून थोड्या better state मध्ये यायला पाहिजे.

Achievement? थोडा sweet muscle pain सोडून तीच चंद्रशीलेवर भेटलेली मनःशांती!

खूप मोठा वाटा असतो जडणघडणीत सोबतीचा, गुरूंचा आणि अनुभवांचा… 

घडत - बिघडत, पडत - सावरत, कालच्यापेक्षा आजचं स्वतःचं version जरा better असावं याचाच सगळा खटाटोप असतो.

महत्त्वाची गोष्ट? जमलं तर जमलं, नाही जमलं तर नाही जमलं. सामोरे जाणं. मला वाटतं, the first step towards anything great is just Showing Up! I feel that's what makes us brave.

©️ ✍🏼सोनल थोरवे  


(P.S.: I know, सलग ३२४ सूर्यनमस्कार अनेकांसाठी अजिबात मोठा आकडा नसेलही, यात काही तीर मारला नाही, लहान पोरं पण करतात वगैरे वगैरे… पण, माझं माझं माझ्या माझ्या आळस, विचार, भय यांच्यासोबतचं भांडण हे फक्त एक उदाहरण. आणखी किती जण कित्येक अडचणींवर, भीतीवर आपापल्या परीने मात करत, स्वतःसोबत, परिस्थितीसोबत झगडत अशा इतरांसाठी लहान-सहान वाटणाऱ्या गोष्टी मिळवत असतात. त्यांच्यासाठी ती ही एक मोठी आनंदाची, कौतुकाची गोष्ट असते. त्या आनंदासाठी लिहिण्याची भीती असतानाही अनुभव लिहिण्याचा हा प्रयत्न.)

No comments:

Post a Comment