![]() |
| Picture Credits: Ishan Shinde |
मनाच्या घरात घर करून राहिलेलं एक स्वप्न...
निर्मळ हास्याइतकं हवंहवंसं,
रात्रीच्या चांदण्याइतकं देखणं.
जगावं कधी तरी आपणही मुक्त पाखरासारखं,
जोडावे बंध आकाशाशी,
गूज करावे फुला-फळांशी,
गिरक्या घ्याव्यात स्वतःशी,
गुणगुणावं स्वतःशी स्वतःचंच गोड गाणं...
ढग होऊन आकाशात
इतस्ततः भरकटावं,
होऊन पाऊस कधी
तृषार्तांवर बरसावं;
अनुभवावं कधी ढगांमध्ये वीज होऊन बागडणं...
व्हावं कधी उगवतीची पूर्व दिशा मोहक,
कधी स्वतः सूर्यच व्हावं,
जरी जीवनदाता,
तरी थोडासा दाहक;
मावळतीला व्हावं पश्चिमेचं समाधानपूर्ण हसणं...
होऊन वृक्ष कधी अर्पावं जीवन इतरांसाठी,
कोणाचा तरी आधार व्हावं.
कधी तप्त रक्त होऊन
नसानसांत भिनावं.
जगावं बनून एक आशेचा किरण,
जावं आपण जेथे, तेथे अवतरावं स्वर्गानं...
मनात घर करून राहिलेलं हे माझं छोटसंच स्वप्न,
नक्कीच केव्हा तरी होईल पूर्ण,
हे त्याचं सख्खं शेजारी स्वप्न...!
☺ सोनल


No comments:
Post a Comment