About Me

My photo
Nature Lover, Traveller, Astronomer, STEM Educator, Teacher Educator, Science Communicator, Writer and Lifelong Learner

Sunday, 15 March 2020

COVID 19 - नवमग्रह


"अगं पोरी, हा असा दुर्गेचा अवतार घेऊन कामाच्या ठिकाणी जाऊ नकोस. वाईट होऊ नकोस कोणासाठी", इति काळजीग्रस्त मातोश्री. "अगं, तुला पण कळतोय नं सिरीयसनेस? संताप स्वाभाविक आहे", सात्विक संतापग्रस्त मी. "कळतंय गं, पण शांत हो", आई म्हटली. आणि माझ्यातल्या त्या दुर्गेला कसं तरी शांत केलं खरं. पण, शंका देवींनी ही संधी साधली. 

"आय.एस.आय. चा एजंट तर नाही नं हा?"
"मानवी बॉम्ब, अगदी 100 टक्के."
"हो, नाहीतर काय? कोण सुज्ञ सुशिक्षित म्हणवला जाणारा तरुण असं काही करेल?"
"हा स्वतःच्या तंदुरुस्तीच्या गुर्मीत इतरांचा जीव मात्र धोक्यात घालणार."
"मानवी जैविक बॉम्ब... अगदी... पक्का..."

हसताय? हसा लेको! 
हे असे माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला मानवी जैविक बॉम्ब्स वाटणारे काका, काकू, चाचा, ऑन्टी, मित्र, मैत्रिणी प्रत्येकाच्या सामोरे येत असणार याबद्दल मला खात्री आहे. 

अगदी विज्ञान किंवा प्रयुक्त विज्ञानाच्या पदवीधर असलेल्यांपैकी जेव्हा हे मानवी बॉम्ब्स सापडतात तेव्हा एक विज्ञानाचा विद्यार्थी आणि प्रसारक म्हणून जीव आणखी दुखावतो. वैज्ञानिक दृष्टी, किंवा खरं तर कॉमन सेन्स, सामान्य ज्ञान ज्याला म्हणावं, जे खरं तर पारंपारिकरीत्या अशिक्षित म्हणू शकू अशा मनुष्यमात्रांकडेही असतं... मग, हे आपले काही विज्ञानक्षेत्रातील बांधव-भगिनी डोक्यावर पडले आहेत काय? 

म्हणजे, वेळ काय आहे? काळ इकडे सर्वांच्या डोक्यावर नागोबासारखा फणा काढून बसला आहे, हे समजून न घेता "कोणता विषाणू माझं काही वाकडं करू शकत नाही", "अरे काय तो करोना बिरोना, मला काय करणार?", "मी अगदी ठणठणीत आहे" असं जर कोणी देशबांधव अरेरावीने म्हणत असेल; जो देशात सर्वप्रथम COVID 19 ग्रस्त एक नव्हे अनेक केसेस सापडल्या अशा ठिकाणी महिन्यापेक्षा जास्त काळ, परदेशी पाहुण्यांच्या (अगदी करोनाची मायभूमी वूहान येथील मंडळीसुद्धा) संपर्कात राहून येणार असेल आणि वरिष्ठांनी सभ्य शब्दांत प्रवासातून इकडे आल्यावर काही दिवस घरून काम करण्याचा दिलेला सल्ला धाब्यावर ठेवून "लोकांना काम टाळायला कारणच हवं असतं", "मी त्यातला नाही", "मी कार्यालयात हजेरी लावणारच" हा हटवादीपणा करत असेल, तर माझ्यातली दुर्गा का नाही जागी होणार?

सर्व जनतेला इथे माहित आहे, तो करोना काका गेले काही महिने जगभरातील आपले बस्तान बसवत चालला आहे. सबंध जगात तब्बल 135 देशांमध्ये हा करोना काका नवम-ग्रह (हो, आता सूर्यमालेत 8 च ग्रह असतात) म्हणून घुसून बसला आहे. आजच्या तारखेला जगभरात 153517 COVID 19 ग्रस्त कन्फर्म्ड, भारतात आत्ता सकाळी 8 वाजता 93 असलेला आकडा 10 वाजता 110 कन्फर्म्ड वर आला आहे. यात जगभरात 5735 तर भारतात 2 दगावले आहेत. भारतात करोना काकांना पसरविणारे मुख्य कारण हे "imported cases" किंवा "बाहेरील देशांतून आलेले प्रसारण" नसून "local transmission" किंवा "स्थानिक प्रसार" आहे.

या अशा परिस्थितीमध्ये अगदी सगळे राजकारण बाजूला ठेवून सरकार आपापल्या ठिकाणी योग्य असे नियम लागू करत आहे, चाचण्या आणि उपचारांची सोय करत आहे; यासोबत जनतेला आवाहन करत आहे की "लेक हो, काळजी घ्या". गरजेचं आहे. योग्य ते सामाजिक भान न बाळगून करोना काकांसाठी दरवाजा का स्वतः होऊन उघडायचा? ठीक आहे, आपण ऐन तारुण्यात आहात, आपली प्रतिकारशक्ती जगात भारी वगैरे आहे... अहो, पण आपले कार्य ज्या जागी आहे तिथे आबालवृध्द कधीही आगंतुक म्हणून येतात ओ. रोज किमान 2 चिल्ली-पिल्ली किंवा 2 वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक हे विना परवानगी सामोरे ठाकलेले असतात "आम्हाला तुमचं सेंटर पहायचंय" म्हणून. जरा त्यांचा विचार करा. 

इथे कोणी कोणाला वाळीत टाकत आहे अशीही स्थिती नाही. आम्हां सगळ्याचं कामावर तेवढंच प्रेम आहे जेवढं तुमचं आहे. आम्ही ही तरुण रक्त आहोत. पण, स्वतःसोबत इतरांची ही काळजी आम्हाला आहे कदाचित. म्हणजे, मला सर्दी-खोकला झाला, किंवा मला काहीही न होता फक्त मी प्रवासातून दुसऱ्या अफेक्टेड रिजन मधून आलो आहे म्हणून मला तुम्ही घरी बसवताय याचं दुःख मानण्यापेक्षा, "मी कोणत्या जीवघेण्या विषाणूचा इतरांसाठी "carrier" किंवा "वाहक" तर होत नाहीये ना?" या सदसदविवेकबुद्धीने केलेल्या विचाराला धरून मी घरून जेवढं जास्त जमेल तेवढं काम करेन. तरुण रक्त, जगात भारी प्रतिकारशक्ती वगैरे असेल ही, पण "सर सलामत तो पगडी पचास" हे सामान्य ज्ञान शाळेत शिकवलेलं जतन केलंय आम्ही.

त्या कोण Google वाल्या काकांच्या काकू, COVID 19 पॉझिटीव्ह सापडल्या तर पळून दुसऱ्या राज्यात गेल्या. आणखी काही पॉझिटीव्ह केसेस उपचार करून न घेता उपचारकेंद्रांतून पळून गेले. कसं व्हायचं आपल्या देशाचं? अरे, उपचार करून बरे होणाऱ्यांची संख्या कैकपटीने जास्त आहे. का आपल्या एका भीतीने अनेक जीव धोक्यात घालायचे? इथे अजून लोक भर रस्त्यांवर थुंकतात; रुमाल वगैरे न वापरता बिनधास्त समोरच्याच्या तोंडांवर खोकतात, शिंकतात. काय चाललंय काय? म्हणजे, मान्य आहे, आपली लोकसंख्या खूप आहे, म्हणून अशी कोण्या परदेशी विषाणूच्या हातात स्वतःसकट अविचारीपणाने देऊन टाकायची? "बडे बडे देशो में छोटी छोटी बाते होती रहती है सेन्योरिता" असे शाहरूख बनून या विषाणूंना आपणहून प्रसाराला मदत करायची का?

एवढा स्वस्त झालाय मार्केट मध्ये माणसाचा जीव? हो, दहशतवादी कारवायांनाही हेच प्रश्न मी विचारू शकते, पण त्या आपल्याला सांगून होत नाहीत. इथे आपण सजग झालो आहोत, काय हरकत आहे थोडं शहाणपण दाखवायला? थोडी काळजी घायला? काय हरकत आहे, जरा कष्ट घेऊन वेळेची गरज ओळखून वागायला?

(आकडेवारी व माहिती स्त्रोत: covidindia.org , www.who.int)

- सोनल 

No comments:

Post a Comment