About Me

My photo
Nature Lover, Traveller, Astronomer, STEM Educator, Teacher Educator, Science Communicator, Writer and Lifelong Learner

Thursday, 19 March 2020

कवितांचं गाव


कवितांच्या गावात एक उनाड धाव,
चंद्रावर कोरलेले आपलेच नाव.
हरलेला डाव नसतोच आपला,
अनवाणी पायांत असतात चपला.

सातही रंग इंद्रधनूचे,
नाजूक गंध रातराणीचे,
झुळूक मनाला मोहविणारी,
सारे काही आपलेच असते;
रडणारे मन ही इथे खळखळून हसते...

कवितांच्या गावात कधी भासतो
अनोळखी देश ही अगदी जवळचा,
नवीन ऋणानुबंध घडवितो
स्नेह आपला अन् कवितांचा.

गुलाबाचा बोचणारा काटा,
रानामधल्या पाऊलवाटा,
समुद्राच्या व्यथित लाटा,
अन् हरवलेल्या धुक्यात वाटा,
आपणच असतो नि आपणच जगतो;
आपणच हरवतो नि आपणच रमतो...

कधी रम्य, कधी दाहक भासणारे
कवितांच्या गावातील सारेच भाव;
पळत-ठेचकाळत, हसत-खेळत
प्रत्येकानं भटकावं एकदा तरी हे गाव.

🌹
सोनल

No comments:

Post a Comment