तूच;
हो अरे, तुझ्याशीच बोलते आहे...
कोणी आहे का इकडे माझ्याशी बोलणारं दुसरं?
तूच आहेस...
सगळीकडे...
अगदी सगळीकडे!
माझ्या शांत-निवांत चालू आयुष्याच्या प्रवासात अचानक विचित्र, खडतर वळणे घेणारा;
सगळं गोड-गुलाबी असताना अचानक दुधात लिम्बू पिळणारा...
हो अरे, तूच तो.
तूच तो,
सारं करून सावरून खूपच लोभस हसून मला पुन्हा मोहात पाडणारा!
इतर कोणाची एवढी मजल माझ्या आयुष्याला धक्का लावण्याची?
नाकासमोर चालणाऱ्या, ताठ ताठ करून बरेचदा स्वतःचा कणा अवघडून घेणाऱ्या अहंप्रेमी माझ्या अस्तित्वाला ठेचून काढण्याची?
फक्त तुझीच!
फक्त तू,
माझ्या अहंकारी फण्यावर चढून त्यावर मोहक तांडव करणारा;
आत्मघातकी एकेक मस्तक तोडून मला नतमस्तक करणारा;
आणि सर्व विकार सोडायला भाग पाडून या नवचैतन्याला उचलून कवेत घेणारा!
हो, हे केवळ तूच करू शकतोस.
हो अरे, तूच!
आता तूच तर उरला आहेस सारं विश्व व्यापून...
आपल्याच अग्नीत राख होऊन पुनर्जन्म घेणाऱ्या फिनिक्सची निर्मिती तू आणि फक्त तूच करू शकतोस.
तुझ्याच लाडक्या रचनेला साऱ्या चढ-उतारांची जाणीव करून देणारा,
प्रसंगी तिचा राग झेलणारा, प्रसंगी बोलही खाणारा;
आणि तरीही सर्वत्र हात धरून ठेवणारा!
हो अरे, तुझ्याशीच बोलते आहे...
कोणी आहे का आसपास तुझ्याविना दुसरं?
आता तूच आहेस...
सभोवती...
आणि अंतरात!
:) सोनल


No comments:
Post a Comment