About Me

My photo
Nature Lover, Traveller, Astronomer, STEM Educator, Teacher Educator, Science Communicator, Writer and Lifelong Learner

Monday, 5 November 2018

कातरवेळ


through my Paintbrush

कातरवेळ निभावून नेणं खरंच अवघड होतं.

एकेक क्षण मनाला खोल-खोल चिरत जात होता. शांतता सहन होत नव्हती, आणि गप्पा मारणारे आसपास असूनही त्यांत ती रमत नव्हती. हातातली कामं संपलीच होती, तरी ती कामं शोधून वेळ मारायच्या प्रयत्नात होती. आई 'तुझ्या सोबत बसते'  असं तिला म्हटली होती; पण 'मला एकटीला बसणं आवडेल' असं म्हणून ती पुन्हा स्वतःला कामात गुरफटून घेऊन बसली होती.
 
जेवण अजून झालं नव्हतं, पण आज तिची जेवण्याची इच्छाही होत नव्हती. कारण कळत नव्हतं तिला, तरी ही कातरवेळ ओलांडून गेली की सगळं नीट होईल याची खात्री तिला होती. म्हणायला शांती, म्हणायला तणतण, म्हणायला हातात काम आणि म्हणायला उगाच रिती वणवण अशी काहीशी गत झाली होती.
 
एवढ्यात टपटपणाऱ्या थेंबांचा आवाज आला, तशी ती धाडकन उठली; अनवाणी एकटीच अंगणात गेली. एकच कृष्णमेघ होता डोक्यावर, मागे तारे ही दिसत होते. अगदी हाताभराच्या अंतरावर एकेक थेंब टपकत होते. पावसाच्या स्पर्शानेच जणू ती भयाण घालमेल संपेल या आशेने ती बाहेर धावली होती; आता ती थेंबांसोबत पकडापकडी खेळत होती...
 
चेहरा कोरडाच, पसरलेल्या बाहूंवर मात्र दोन थेंब जास्त बरसत होते, तेव्हा ती हळूच सरकून चेहरा तिथे नेत होती. चेहऱ्यावर बरसणारे थेंब तिची घालमेल धुवून टाकतील अशा वेड्या समजुतीत उगाच धडपडत होती. जोरदार बरसण्याचा वगैरे असा काही त्या मेघाचा आवेश नव्हता, हे पाहून ती धरणीवर आडवी झाली होती. पुढे जाता जाता त्या कृष्णमेघाने जो काही मोजक्या थेंबांचा शिडकावा केला, त्यातही आनंद मानून ती मनापासून भिजत होती. मेघाने आपली ओंजळ रिती केली, आणि डोक्यावर ताऱ्यांनी जाळी धरली. तिची घालमेल आता शांत झाली होती; त्या आगंतुक मेघाचे आभार मानून ती घराकडे वळली होती. 
 
त्या मेघाने तिला जाळणारी कातरवेळ सोबत नेली होती. 
ही कातरवेळ निभावून गेली होती...

🙇
सोनल

No comments:

Post a Comment