(मॉन्सून चा पाऊस आणि आषाढीची वारी यांनी हा जो काही माहौल तयार होतो नं त्यामुळे वारीमध्ये प्रत्यक्ष सामील नसणारे देखील मनाने वारकरी होऊन विठूच्या गजरात चिंब भिजत राहतात. आता बघा, वारीला प्रत्यक्ष जायला सुट्टी काढणं अजून तरी शक्य झालेलं नाही... पण म्हणून मनाने हा असा असहकार पुकारावा म्हणजे काम ही बोंबललंच की! अशा शांत घालमेलीच्या वेळी साऱ्या संसारी संतांची शिकवण मदतीला धावून येते... आश्चर्य म्हणजे न सुचणारं केव्हाचं या पावसात अडकून राहिलेलं काम विनासायास होऊन जातं!
आणि एक प्रेमळ प्रश्न समोर येतो... कामात, संसारात विठू पाहणाऱ्या या संतांच्या अभंगांत असलेली शिकवण मदतीला धावून आली की त्यांच्या रूपात स्वतः त्यांचा लाडका विठुरायाच धावून आला असावा बरं?)
आणि एक प्रेमळ प्रश्न समोर येतो... कामात, संसारात विठू पाहणाऱ्या या संतांच्या अभंगांत असलेली शिकवण मदतीला धावून आली की त्यांच्या रूपात स्वतः त्यांचा लाडका विठुरायाच धावून आला असावा बरं?)
~~~~~~~~
सावळा सावळा विठू दिसे भोवताली
ध्यानी-मनी ओठी-कानी त्याचें नामाची सावली ।।
लिहू जाता जरा काही उमटतां कुठे शाई
उमटते नाम त्याचे, दृष्टी तयालाच पाही ।।
लेखणीले काय सांगू? बये, काम खूप आहे;
ग्रह-गोलांचा संसार तुले मांडायाचा आहे ।।
विठू सार तू कडेला, अवकाश घे जवळी
मांड जीवनी तयाची तव शब्दांच्या जंजाळी ।।
ऐकेल ती नवल, शब्द सुचेनाच काही
इतक्यात अवकाश सारे दाटुनिया येई ।।
ग्रह-गोल-तारका नि घन वायूंचे जमता
फेर धरूनिया सारे विठूरंगी ते रंगता,
विश्वरूप एक क्षण अंतरंगी आकळतां
शाई लिहाया लागली विश्वरूप जन्मगाथा ।।
© सोनल
😇
💞

No comments:
Post a Comment