About Me

My photo
Nature Lover, Traveller, Astronomer, STEM Educator, Teacher Educator, Science Communicator, Writer and Lifelong Learner

Tuesday, 3 November 2026

खळ्या पहायला...

कधी कधी आयुष्यात इतकं गंडायला होतं नं, की विचारू नका... उगाच कोणत्या ध्येयांच्या मागे "अडकवलेला" इवलासा एक जीव... 

एकच, तो गेला की संपलं सगळं.

जन्म घेण्यापूर्वी त्याला एक तर कोणी विचारलेलं नसतं "interested आहेस का?" Without consent आपल्याच शांतीत गर्क ऊर्जेला अनोळखी, chaotic गर्तेत ढकल्यासारखं काहीतरी सतत वाटत असतं...

आणि तो संपवावा असं वाटायला लागतं एका point ला. 

कारण? 

थकायला होतं, धावपळ करून. एकटा जीव काय काय करणार? जबाबदाऱ्या, कर्तव्य, स्वप्नं, इत्यादी इत्यादी सगळा सगळा load असा सारखाच कोसळत असतो अंगावर. तरी नशीब चांगलं म्हणून तसं सगळं लादलेलं ही नाही हां. पण, तरी... होतं असं.

आणि ते ' नकोच हे आणखी ' पर्यंत पोहोचता पोहोचता परवा ज्यांना शिकवत होतो आपण त्यातलं एक निरागस लेकरू उगाच आठवतं.

आरस्यांबद्दल शिकवत होते, आणि आपलीच गालावरची खळी बघून खुशीत हसलं होतं, वर 'I have a dimple, I have a dimple' म्हणून नाचत नाचत गोड हसत बाकींना सांगत होतं. 

किती किती सोपं होतं आयुष्य... निसर्गाने गालांवर खड्डे दिले, खरं त्याचं कौतुक होतं. Selfie camera सुरू केला... त्यात दिसणारं लेकरू म्हटलं, "I too have a dimple"... पण त्या खळ्या पहायला भलत्या dark extreme ला पोहोचलेल्या थकल्या जीवाला दुःख विसरून हसावं लागलं.

प्रत्येक वेळी हात धरून आधार द्यायला, मार्ग दाखवायला कोणी सोबत असतंच असं नाही. कदाचित म्हणून आपण कितीही दुखावलो गेलो, हरलो, थकलो तरी माणसं जोडणं थांबवत नाही... आठवणी वेचणं थांबवत नाही... कधी कुठल्या एकाकी अंधारल्या क्षणी कोणती आठवण माणूस म्हणून समोर येईल कुठे सांगता येतं?

✍🏽⚡© सोनल थोरवे