(एखादा छंद, एखादी कला जोवर सोबत आहे तोवर या जगात कोणी एकटं पडेल असं मला वाटत नाही... असाच सतत सोबत असणारा एक छंद - भावसौंदर्य व्यक्त करणारी पुस्तकं...)
मैत्री असावी पुस्तकांशी
एकाकीपण सुसह्य होतं
आपली माणसं, आपलं प्रेम, आपली श्रद्धा आणि आपला विश्वास...
खोटी भुलावण आपणच आपली करत असतो,
आणि या आपल्यांची सोबत सुटल्यावर एकाकी आपणच रडत बसतो.
अशा वेळी फक्त पुस्तकं येतात साथीला.
हळूच डोळ्यांतून हृदयात उतरणं जमतं त्यांना...
हृदयाला भिडलेली पुस्तकं मग कधी उशाशी, कधी कुशीशी येतात;
एखाद्या जीवलगासारखी.
ती रुसत नाहीत, राग धरत नाहीत, ना कधी हट्टाला पेटतात.
जे आहे ते सरळ स्वच्छ;
उघडून अंतरंग सारं सांगतात.
कोणती कोडी घालत नाहीत, की कोणत्या अटी.
स्वभाव तर किती खुला, आसमंतासारखा निर्मळ...
सागरासारखी खोली आणि एकच काय ते जगण्याचं तत्व,
'तू मला वाचून मला समजून घ्यायचा प्रयत्न केलास,
मी तुला माझा सारा आनंद, सारं प्रेम देतो.'
आपला जीव जडलेली माणसंही या पुस्तकांसारखी असती तर...?!!
:)
-
सोनल

👍👍👍👌👌👌
ReplyDelete