फुलाने फुलायचं असतं; सौंदर्य वाटत जगायचं असतं.
त्याने विचार करायचा नसतो
दगडाच्या पायाशी निर्माल्य होणार
की कोणा प्रेमींना जोडणारा दुआ म्हणून
एखाद्या वहीत बंदिस्त होणार;
त्याने विचार करायचा नसतो
कोणा ललनेच्या केशसंभारास रौनक ठरणार
की कोणा मृतास अखेरची
गंधित श्रद्धांजली ठरणार...
फुलाने फक्त फुलायचं असतं;
सौंदर्य उधळत जगायचं असतं.
झाडावरंच कोमेजून सारी फुलं संपत नाहीत
प्रत्येकाचं प्राक्तन असतं वेगवेगळ्या शाईत;
निसर्गदत्त असतं मात्र प्रत्येकाचं सौंदर्य
खुलवायचं असतं ज्याचं त्याने अंतरासहित.
एवढंच लक्षात ठेवायचं असतं,
आपलं नैसर्गिक दान लुटायचं असतं
त्याचा रंग-गंध जाणण्याचं सौंदर्य सर्वांकडे नसतं,
साऱ्यांकडून तारीफेचा अट्टाहास नसावा
ती न करणाऱ्यांबद्दल देखील कधी दुःस्वास नसावा,
ती न करणाऱ्यांबद्दल देखील कधी दुःस्वास नसावा,
जपावी फक्त निकोप वृत्ती
स्वतःस जगल्याचे समाधान चित्ती.
जाणकारांच्या डोळ्यांतील कौतुक सार्थकतेचा दाखला असला तरी
अजाणांना क्षमादान देत आपलंच अंतर उजळायचं असतं.
निरागस फुलणं जपायचं असतं
फुलाने निर्मळच संपायचं असतं...!
स्वतःस जगल्याचे समाधान चित्ती.
जाणकारांच्या डोळ्यांतील कौतुक सार्थकतेचा दाखला असला तरी
अजाणांना क्षमादान देत आपलंच अंतर उजळायचं असतं.
निरागस फुलणं जपायचं असतं
फुलाने निर्मळच संपायचं असतं...!
- सोनल


No comments:
Post a Comment