About Me

My photo
Nature Lover, Traveller, Astronomer, STEM Educator, Teacher Educator, Science Communicator, Writer and Lifelong Learner

Wednesday, 13 May 2015

चैत्र आणि वैशाख

(सर्वांच्या आयुष्यात एकदा तरी घडणारा प्रसंग:
आपल्याला एरवी समजून घेणारेच आपल्यासोबत तात्विक वादाचे शिकार झाले आणि त्यांच्या साथीची गरज असतानाच आपल्याला एकटे सोडून हट्टाने थोडे लांब झाले...
स्वतःची समजूत स्वतःच काढायची छानशी जबाबदारी स्वतःवरच येऊन पडली
तेव्हा कुठे शब्दांची अन् विचारांची अशी गळाभेट घडली.)

आपल्यासोबत आपल्याला समजून घेणारं कोणी तरी असावं, असं का वाटतं नेहमी? का भय वाटतं या एकटेपणाच्या बागुलबुवाचं?
हं; शेवटी जन्मापासून मृत्यू पर्यंत नैसर्गिक असलेला हा एकच घटक - एकटेपणा!

तो बाजूचा डोंगर, झाडा-वेलींना अंगाखांद्यावर घेऊन
वादळ-वाऱ्याशी टक्कर देतो, एकटाच!
तो समोरचा सागर, आपल्या फेसाळत्या भावना घेऊन
किनाऱ्याकडे झेपावत राहतो, एकटाच!
का? का मानवी मनाला चीड या एकाकीपणाची?
शेवटी, सर्वांना प्राण पुरविणारा वाराही वाहतो एकटाच!
ऐकलंय कधी कोणी, सूर्याला एकाकी वाटतंय;
म्हणून उगवलाच नाही पट्ठया, कारण सारं सुनं-सुनं भासतंय?
नाही ना?
मग का सारं विश्वच थांबून जातं माझ्यासाठी,
जेव्हा वाटतं एकाकीपणाचं आभाळ मला टेकतंय?
का नाही स्वीकारता येत एक नैसर्गिक सत्य?
साथ-सोबत-एकटेपणा - सारे मनाचेच खेळ,
सारे सारखेच मिथ्य!
एकट्या जगत आलेल्या आपल्या मनाला लाडावून ठेवतात
आपले luckily भेटलेले मैत्र;
फुंकर घालतात जखमांवर,
रखरखीत उन्हांत सुखावून जातो चैत्र.
चैत्रातील वसंत वेडावून जातो जीवाला;
जाताना पाहत नाही,
मागाहून येणारा वैशाखवणवा जाळून टाकतो मनाला...
चैत्र काय, वैशाख काय - दोन्ही ऋतूच, बदलणारे
समज-गैरसमजांच्या खेळात अशी नाती हिंदकाळत ठेवणारे!

(सारांश असा, कोणाचं मैत्रीचं झाड कधी वादळाने तुटू नये. त्याच्यावरच स्वप्नांची पाखरं झोके घेतात; सावलीखाली त्याच्या थकलेले जीव सुखाने क्षणभर विसावू शकतात.)

-
   :)
   सोनल

No comments:

Post a Comment