अगदी आठवतंय तेव्हापासून, म्हणजे स्वतःच्या पायांवर चालायला शिकल्यापासून, जुन्या मोडकळीला आलेल्या so called "वाड्या"च्या दहा बाय दहाच्या एका खोलीच्या घरात असताना ते अगदी त्या तुलनेत बरंच प्रशस्त घरी आल्यानंतरही सर्वांत जवळचा, आपला वाटणारा सण म्हणजे गौरी - गणपती.
सर्वांच्या घरी गौरी बसत नाहीत, आणि ज्यांच्याकडे बसतात त्यांनी कधी गणपती - गौरी म्हटल्याचं आठवत देखील नाही. आमच्यासाठी गणपती जरी चार दिवस आधीपासून पाहुणा होऊन आला तरी नाव गौराईचं आधी येतं.
खरी गोष्ट काय कोणाला माहित, पण गणपती हा आजोळी, मामाकडे राहायला येणारा लोभस पाहुणा आणि गौरी (कोणी म्हणतं, गणपतीच्या बहिणी, कोणी म्हणतं आई) या माहेरची माया अनुभवण्यासाठी मोजकेच दोन - तीन दिवस येणाऱ्या माहेरवाशिणी.
गौरी - गणपतीचा सण जवळ आला की सगळं घर लग्नघरासारखं लख्ख केलं जायचं. पुरुषमंडळींची आरास कोणती, कशी करायची यावर खलबतं व्हायची. स्त्रियांची या हक्काच्या पाहुण्यांचे खाण्यापिण्याचे सर्व लाड पुरवण्यासाठी फराळ बनवायला लगबग असायची. आणि आमच्यासारखी चिल्ली - पिल्ली या दोहोंमध्ये लुडबुड करायची. कधी बाबा, आजोबांसोबत पताका काप, शाळेत शिकवलेले रंगीत प्लास्टिकच्या पिशव्यांपासून हार बनव, तर कधी मध्येच आई, आजीसोबत लाडू वळताना लहानग्या हातांत मावणारे गोट्यांच्या आकाराचे लाडू बनव. आजीला कौतुक असायचं. हे लहान लाडू, लहान करंज्या वेगळ्या मांडुयात देवीपाशी म्हणायची.
जोरजोरात घंटा वाजवत, गजर करत गणेशाचं आगमन व्हायचं. रोजची दोन वेळेची आरती, आरतीला वाड्यातली (नंतर सोसायटीतील) जमणारी सर्व काका - काकू - ताई - दादा मंडळी यांचा हवाहवासा वाटणारा कल्ला. लहानपणापासून ते अगदी आतापर्यंत या सर्व गोंधळात आपण धावत-पळत आजीपाशी गेलं की गालगुच्चे घेत "माझी गौर आली" असं म्हणणारी आजी नेहमी आठवते. आणि आमच्याकडे सगळ्या बहिणीच, म्हणजे या घरच्या गौरायांचं कौतुक साहजिकच. आमच्या कुटुंबांत भावांचं आगमन थोडं नंतर झालेलं.
गौरी बसवताना लोखंडी तिवया, त्यांच्या पोटात गोड फराळाचे डबे ठेवून त्यांना साड्या नेसवणं तसं कौशल्याचं काम. यांत साडीची एक निरीदेखील हातात येत नसताना मदत करणारे आम्ही उत्साही. त्यावर पूर्वी बसणारी कापडाची, कारागिरांनी हातांनी शिवलेली धडे (आता साचेबद्ध POP च्या धडांनी यांची जागा घेतली, त्यामुळे गौरीदेखील भरल्या घागरीसारख्या पासून सडपातळ या रुपात सामोरे आल्या). यावर पूर्वीचे, आजीच्या सासूच्या काळचे पितळी मुखवटे. धीरगंभीर तरी गोडवा असणारे या गौरींचे एकूण रूप, POP च्या जमान्यात बहुतांश फक्त गोड राहिलेले.
आठ वर्षांची असताना आजोबा गेले आणि गौरी - गणपतींचे आजोळ हे आजी - आजोबांच्या शनिवारातल्या घरातून आमच्या निवासस्थानी shift झाले. आजोबा नव्हते. पण सणाची धमाल मात्र तीच. आजी आपल्या सुनांना, नातवंडांना सगळ्या सूचना द्यायची आणि आम्ही सगळे तसं करायचो.
आई - बाबांचं वय जसं एकूण कुटुंबियांच्या अपुऱ्या पडणाऱ्या सहकार्यामुळे ही सर्व धावपळ physically सोसेना इतकं झालं तसं आमच्या बाप्पांचं आजोळ पुन्हा shift केलं गेलं. काही कारणांमुळे आता आम्हालाही तितकासा वेळ देणं तसं शक्य होईना.
आताशा माझे गौरी - गणपतीचे दिवस रिकामेच येतात, रिकामेच जातात. आमचे देव आमच्या हृदयातच सतत मायेचा वर्षाव झेलत राहतात, आणि सुख - दुःखांच्या चार गोष्टी जमेल तसं करत राहतात. आता त्यांचं विसर्जन होत नाही. आमच्यासाठी मूर्त स्वरूपातून अमूर्ताकडे त्यांनीही आनंदाने झेप स्वीकारली आहे.

आपले सण हे फार विचारपूर्वक, काही ना काही संदेश समाजमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी, कधी निसर्गातील बदल, तर कधी मानवी जीवनातले टप्पे प्रतीकात्मक रूपात साजरे करण्यासाठी घडवले गेले आहेत असं मला नेहमी वाटतं.
गौरी - गणपतीचा लळा जरा जास्त, कारण - आपण आजोळी सुट्टीला जातो तसाच आपल्यातला होऊन येणारा बाप्पा... इतर वेळी नवरा - मुलं - सासू - सासरे यांची चोवीस तास देखभाल करण्यास तत्पर स्त्रीसाठी सुट्टीतला तो चार दिवसांचा कोड - कौतुकाचा वर्षभरासाठी energy पुरवणारा माहेरवास, तशा माहेरवासाला येणाऱ्या या गौराई... आपणच जसे सुट्टीच्या दिवसांत गौरी - गणपती असतो, तसे आपल्याकडे चार दिवस येणारे पाहुणेही असतात. आयुष्यातील सर्वच phases अशाश्वत असल्या तरी त्यांचे भाव, अनुभव, feel कायम स्मरणात राहतात; त्यामुळे आपल्या वाटणीचे पदरी पडलेले काही दिवस हे आनंदात, कोणा प्राणिमात्राला न दुखावता घालवता आले तर घालवावे आणि चेहऱ्यावर तेच हसरे भाव घेऊन काळाच्या नदीत विसर्जित व्हावं... सगळंच जणू आपलंच. जसा हा सण पाहुणचाराचे संस्कार घडवतो, तसेच आपल्याच मनात खोल उडी मारून परमेशाच्या पार्थिव रूपाचे प्रतिबिंब पाहण्यास भाग पाडतो म्हणून कदाचित मला जास्त ओढ लावतो.
No comments:
Post a Comment