उदरातल्या गर्भाच्या हृदयाचे पहिले ठोके ऐकू यावे आणि मातेचं मन उत्साह,
उत्सुकता, आशा अशा अनेक भावनांनी उचंबळून यावं तसं माझं होतं, ढोल-ताशाचा
वर्षातला पहिला ठोका ऐकू आला की...!
सुरुवातीला
ढोलांची कच्ची धडधड, ताशांची कच्ची तडतड कानांवर पडायला लागते. हळूहळू
वादनाचा जसा योग्य शिक्षण आणि पोषणाने विकास होऊ लागतो, त्या कच्च्या धडधड
आणि तडतडीत देखील एक प्रकारची सुसूत्रता जाणवायला लागते. वेगवेगळ्या
लय-तालांचे धडाकेबाज मिश्रण रूप साकारायला लागते.
या
जडणघडणासाठी कष्टही तेवढेच असतात. घडविणाऱ्याने ढोल-ताशाचा एकेक भाग जसा
प्रेमाने घडवलेला असतो, तसाच वादकाने त्याला प्रेमाने जपायचा असतो. टिपरू
आणि काड्या वापरून वीरश्री जागवणारा, मेघगर्जनेसह तडाडणाऱ्या विजेसारखा
गगनभेदी नाद निर्माण करताना त्या ढोल-ताशाचा गंभीर आत्मा समर्थपणे मिरवायचा
असतो.
गर्भासह माताही विकसित व्हावी तसा वादक तयार होऊ लागतो; आणि येतो तो दिवस - बाप्पाच्या आगमनाचा! बाप्पासमोर पहिलं वादन, त्याच्या स्वागतार्ह, त्याला समर्पित... पहिलं-वहिलं पूर्णत्वाला आलेलं वादनाचं प्रथमदर्शन, प्रथमश्रवण, प्रथम समर्पण! ताशा लय बदलतो तसा ढोल ताल धरतो... आता सर्वत्र निनादते ती परिपक्व लय-तालाची दिमाखदार जुगलबंदी. भारावलेल्या वातावरणात संचारतो एक नवा उत्साह, एक नवं चैतन्य, एक नवा आनंद! सारं वातावरण भारावून टाकणारं जोरदार वादन झाल्यावर माझ्यातल्या वादकाचा नुकताच एका नवचैतन्याला जन्म दिलेल्या मातेप्रमाणे देह सकारात्मकरित्या थकतो, समाधानाने मन निश्चिंत होतं आणि वीररसाची जागा शांतरस केव्हा घेतो उमगत देखील नाही.
पुढचे
दहा दिवस असेच त्या चैतन्याचे लाड करण्यात जातात, त्याला गोंजारण्यात
जातात, त्याला मिरवण्यात जातात. बाप्पा आले तसे पुन्हा आपल्या गावी
निघतात... वर्षातल्या शेवटच्या मिरवणुकीचं धमाकेदार वादन होतं... तो शेवटचा
दिवस संपूच नये असं वाटत असतानाच आपापली वाद्य पुन्हा मोकळी करून उचित
स्थळी पोहचविण्याची वेळ केव्हा येते कळत ही नाही. आता निरोपाच्या क्षणी वेध लागतात पुढच्या खेपेचे... बाप्पासोबत या वाद्यवेडालाही पुढच्या वर्षी लवकर या म्हणत मी पुन्हा एकदा ती तडतड अन धडधड हृदयात साठवून त्या स्वप्नवत सुनाद विश्वातून बाहेर पडते.
😇 सोनल


सुरेख ..👍
ReplyDeleteधन्यवाद! :)
Delete