"साऊ, आज गंगाकाठी भेटूया?"
"गंगा? आज सरकारांचा मूड एकदम धिंगाणा दिसतोय", मनातल्या मनात म्हणताना साऊच्या काळजाचा क्षणभर ठोका चुकला; कुतूहल वाढलं.
त्यांची भेटायची आवडती जागा - नदीकाठ.
त्याने फक्त विचारायचं, “आज कुठे भेटायचं?”
नदी तीने निवडायची… तिच्या मर्जीने.
त्याने ऐकायचं; कोणताही प्रश्न न विचारता तिथे वेळेत पोहचायचं.
अर्थात, प्रत्येक निवडीमागे तिचं तिचं असं समर्पक कारण असायचं.
सुट्टीचा दिवस, म्हणून वेळ तशी दिवसाचीच… आज आकाशात तारे उमटू लागेपर्यंत गप्पा होणार हे नक्की. सूर्य तसा तळपताच, पश्चिमेकडे हलकेच उतरत आहे. पण दिवसही थंडीचे, त्यात ऋषिकेशाच्या दिशेला वातावरणात सुसह्य गारवा… आसपासच्या दगड-कपाऱ्यांना धडकून फेसाळून गंगा रौद्र गर्जना करते आहे... ते ओलांडताच विस्तीर्ण पात्र... काठा-कपारीशी उग्र, गरजती गंगा पोटाशी जावं तशी धीर-गंभीर स्वरूप घेताना दिसते आहे. काठावर अगदी समुद्र किनाऱ्यावर लाटा आदळून नाद गाजावा तसाच नाद घुमतो आहे… खळ्ळ! खळ्ळ!!! आजूबाजूला नाही म्हणायला थोडीफार वर्दळ…
गंगा - कृष्णेसारखी सूज्ञ, शांत नाही. की अगदी नवख्या नदीसारखी अल्लड, अवखळ म्हणावी तशीही नाही. ही म्हणजे जणू सागराचं लघु प्रतिरूप - इथे भयाने अंगावर शिरशिरी यावी इतकी उग्र, तर लागलीच पुढे मनाने उडी घेऊनही तळ गाठणं अवघड इतकी शांत, खोल. गंगेचं हे रूपच वेगळं.
नेहमीप्रमाणे तिच्याकडे पाहत तिच्या गोष्टी ऐकून झाल्या. आधीच समजायला कठीण झाल्या कलियुगात या सत्ययुगी भाबड्या जीवाची होणारी ओढाताण, संघर्ष, आणि हरतानाही तरण्याची धडपड; कोवळ्या कळीने वेळेच्या गरजेपोटी मनाविरुद्ध का होईना पण धारण केलेलं काटेरी निवडुंगाचं रूप - सगळं सगळं तिच्या अनुभव कथनातून सामोरं येत होतं. ती थांबली तशी तिने "तू बोलत नाहीस बुवा काहीच, मीच का सगळं बोलू?" म्हणून रुसण्याच्या आधीच त्यानेही थोडक्यात आपल्या गोष्टी सांगितल्या. आता या देवाणघेवाणीची मोहक सवय त्यालाही जडली होती. हे कुठे अडलं की चुकल्या-चुकल्यासारखं वाटायचं.
सूर्यास्त होत आला तशी वर्दळ सरली, गोष्टी थांबल्या, शांतता पसरली. एकमेकांचे हात हातात घेऊन दोघे वाहत्या गंगेकडे पाहत मौन बसले.
आज प्रश्न पडण्याची वेळ साऊची होती... कसं जमतं हिला? कसं जमतं तो मुळात शांत-गंभीर गाभा काळानुसार गरजता करणं? कसं जमतं ते वरवरचं, पण गरजेचं रौद्रपण पुन्हा पोटाशी घेऊन मूलत्वाला तितक्याच निरागसपणे येणं? उराशी कालातीत राहून काठाशी काळानुरूप बदल स्वीकारणारी गंगा होणं हीच करू जाणे.
तिच्या प्रश्नांची उत्तरं वेणूच्या सुरांवर तरंगत ठेवणारा तो... सावळ्याचं स्वतः असं प्रश्नात हरवणं क्वचितच. न राहवून त्याच्या लाडक्या अस्त्राची आठवण आज तिनेच करून दिली. बासरीच्या स्वरांत गुंतलेल्या गंगेच्या गाजेसोबत, त्या चकाकत्या स्वर्णवर्णी विस्तीर्ण पात्राकडे पाहत ती त्याच्या खांद्यावर अलगद विसावली. डोळे कधी मिटले कोणास ठाऊक.
गंगा जाणून होती आपली खोली... कदाचित इतकी, की तिच्या कृष्णालाही कधी तिचा तळ उमगणार नाही.
✍🏼⚡©सोनल थोरवे

No comments:
Post a Comment